Football Players Stars Beauty Secrets | फिफा वर्ल्डकप स्टार्सचे‘ब्युटी सिक्रेट’ उघड!

मेस्सीपासून रोनाल्डोपर्यंत दिग्गज खेळाडूंच्या लूकचा सर्जन्सनी केला खुलासा
Football Players Stars Beauty Secrets  |
Football Players Stars Beauty Secrets | फिफा वर्ल्डकप स्टार्सचे‘ब्युटी सिक्रेट’ उघड!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : फिफा वर्ल्डकप २०२६ चा थरार रंगत असताना, मैदानाबाहेरील एका चर्चेने क्रीडा जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. जगातील आघाडीचे फुटबॉलपटू वाढत्या वयातही इतके तरुण आणि तजेलदार कसे दिसतात? याबाबत एका आंतरराष्ट्रीय मीडियाने नामांकित प्लास्टिक सर्जन्सच्या मदतीने खेळाडूंच्या फोटोंचे विश्लेषण केले असून, त्यांच्या कथित ‘कॉस्मेटिक ट्रीटमेंटस्‌’चा (सौंदर्य शस्त्रक्रिया) खुलासा केला आहे. अनेकदा कडक डाएट, उत्तम फिटनेस आणि हायड्रेशनमुळे खेळाडूंचे वय लपते; परंतु काही खेळाडूंनी स्वतःला परफेक्ट दाखवण्यासाठी महागड्या सर्जरी आणि ‘ट्विकमेंट्स’चा आधार घेतल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

१. लिओनेल मेस्सी (वय ३८)

अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने नाकाची सर्जरी, बोटॉक्स आणि चीक फिलर्स केल्याचा दावा एका कॉस्मेटिक तज्ज्ञाने केला होता. मात्र, मेस्सीची पत्नी अंतोनेला रोकुझो हिने हे दावे फेटाळून लावत ‘‘मेस्सीने कधीही कोणतीही सर्जरी केलेली नाही,’’ असे स्पष्ट केले. न्यू यॉर्कचे डॉ. डेव्हिड पिंकस यांच्या मते, मेस्सीने कोणतीही सर्जरी केल्याचे दिसत नाही. मात्र, उन्हात राहूनही त्याची त्वचा खूप तरुण दिसते, त्यावरून तो लेझर ट्रीटमेंट घेत असावा. तसेच, दातांची ठेवण सरळ करण्यासाठी त्याने ‘इनव्हिझलाईन’ वापरल्याचे दिसून येते.

२. ख्रिस्तियानो रोनाल्डो ( वय ४१)

पोर्तुगालचा स्टार रोनाल्डो वय वाढले तरी विशीतील तरुणासारखा दिसतो. वर्ल्डकपमधील उझबेकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर ‘‘गोल्सपेक्षा जास्त प्लास्टिक सर्जरीज’’ अशा कमेंटस्‌ युजर्सनी केल्या होत्या. डॉक्टरांच्या मते, रोनाल्डोच्या डोळ्यांच्या कडांवर सुरकुत्या कमी झाल्या आहेत, त्‍यावरून तो ‘बोटॉक्स’ वापरत असावा. तसेच त्याच्या ओठांचा आकार पूर्वीपेक्षा वाढला असल्याने ‘लिप फिलर्स’चा वापर आणि त्वचा नितळ ठेवण्यासाठी ‘स्किन रिसर्फेसिंग लेझर’ केल्याची शक्यता आहे. ‘पोर्सिलेन व्हिनियर्स’ लावून त्याने आपले दात चमकदार केले आहेत.

३. डेव्हिड बेकहॅम ( वय ५१ )

इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम एका जाहिरातीत दिसल्यानंतर त्याच्या फुगलेल्या गालांमुळे चाहत्यांना धक्का बसला होता. सर्जन्स डॉ. पिंकस यांच्या मते, बेकहॅमच्या चेहऱ्याचा मधला भाग पूर्वीपेक्षा खूप भरलेला दिसतो, जो ‘फॅट ट्रान्सफर’ किंवा ‘फिलर्स’मुळे असू शकतो. यामुळे त्याचे वय थेट काही वर्षे कमी झाल्यासारखे वाटते. तसेच, २०१९ च्या तुलनेत त्याची त्वचा आता अधिक एकसमान दिसते, जी लेझर ट्रीटमेंटची कमाल आहे. याशिवाय, त्याने ‘हेअर ट्रान्सप्लांट’ (केस रोपण) केल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

४. नेमार (वय ३४)

ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारने स्वतः २०२२ च्या वर्ल्डकपपूर्वी चेहऱ्यावर स्किन ट्रीटमेंट घेत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. नेमारच्या चेहऱ्यावर कोणतीही मोठी शस्त्रक्रिया झालेली नाही; परंतु त्याने चेहऱ्याच्या सुरकुत्या घालवण्यासाठी हलके बोटॉक्स केले आहे. दंततज्ज्ञ डॉ. डॅनियल नेसन यांच्या मते, त्याचे दात आता अत्यंत पांढरे शुभ्र आणि कृत्रिम वाटतात, जे ‘व्हिनियर्स’ लावल्याचे सिद्ध करते.

५. मोहम्मद सलाह (वय ३४ )

इजिप्तचा हा खेळाडू २०२४ मध्ये अचानक आपले प्रसिद्ध लांब केस कापून लहान केसांच्या नव्या लूकमध्ये मैदानावर उतरला होता. सलाहच्या फोटोंचे विश्लेषण करताना डॉक्टरांनी सांगितले की, २०२३ मध्ये सलाहचे कपाळ दोन्ही बाजूंनी मागे जात होते; परंतु नवीन फोटोंमध्ये तिथे दाट केस दिसत आहेत, जे केवळ ‘हेअर ट्रान्सप्लांट’मुळेच शक्य आहे. त्याच्या चेहऱ्यावर मात्र इतर कोणतीही सर्जरी झालेली नाही.

६. गॅरेथ बेल (वय ३३)

२०२३ मध्ये निवृत्त झालेला वेल्सचा माजी खेळाडू गॅरेथ बेल याच्या कानांच्या आकारात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. करिअरच्या सुरुवातीला गॅरेथचे कान खूप बाहेर आलेले दिसायचे; मात्र नंतर ते चेहऱ्याला समांतर झाले. डॉक्टरांच्या मते, त्याने आपले कान मागे खेचण्यासाठी ‘ओटोप्लास्टी’ ही सोपी शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

इतर खेळाडू

अमेरिकेचा लँडन डोनोव्हन याने हेअर ट्रान्सप्लांट अयशस्वी झाल्यानंतर ‘हेअर सिस्टीम’ (कृत्रिम केस चिकटवणे) चा वापर केल्याचे उघडपणे मान्य केले आहे. तर दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याने कोणतीही सर्जरी केलेली नसून, औषधे आणि विटामिन्सच्या जोरावर आपले केस टिकवून ठेवल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news