

लंडन : ग्रीसच्या 'गल्फ ऑफ कोरिंथ' मध्ये एका अत्यंत दुर्मीळ आणि विचित्र अशा डॉल्फिनचा शोध लागला आहे. त्याने त्याच्या फ्लिपर्सवर म्हणजे दोन्ही बाजूंच्या परांवर हूकसारखे दिसणारे अंगठे विकसित केलेले आहेत. पेलागोस सेटाशियन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी दोनवेळा हा डॉल्फिन पाहिला आहे. त्याची काही छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
ग्रीसच्या नार्याजवळ बोट सर्व्हे करीत असताना हा डॉल्फिन दोनवेळा दिसून आला होता. त्याच्या फ्लिपर्सवर असे 'अंगठे' असले तरी त्याचे पोहणे सर्वसामान्य डॉल्फिनसारखेच आहे. या अंगठ्यांमुळे त्याच्या पोहण्याची गती, उड्या मारणे, वळणे, खेळणे यावर परिणाम झालेला नाही. अलेक्झांड्रोस फ्रांटझिस यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की गेली तीस वर्षे आम्ही खुल्या समुद्रात सर्व्हे करीत आहे; पण प्रथमच अशा प्रकारचा डॉल्फिन आम्ही पाहिला.
त्याची फ्लिपर मॉर्फोलॉजी अनोखीच आहे. फ्रांटझिस यांनीच या डॉल्फिनची छायाचित्रे टिपली आहेत. कोरिंथचे आखात हे ग्रीकची मुख्यभूमी आणि पेलोपोनीज पेनिन्सुलामधील लोनियन समुद्राचा अडकलेला भाग आहे. तिथे डॉल्फिनच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यामध्ये कॉमन डॉल्फिन, रिस्सोज डॉल्फिन, स्ट्रीप्ड डॉल्फिन्स आदींचा समावेश आहे.