

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या वरच्या स्तरामध्ये 1268 मीटर म्हणजे आतापर्यंतचा सर्वात खोल छेद घेऊन जीवसृष्टीच्या उत्पत्तीबाबतचे नवे पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. इतके खोल उत्खनन वैज्ञानिकांच्या एका टीमने समुद्रातील पर्वत अटलांटिस मैसिफच्या क्षेत्रात केले आहे. उत्तर अटलांटिक महासागराच्या मध्यभागी असलेल्या या क्षेत्रामध्ये पृथ्वीचे आवरण तुलनेने अधिक खुले असते, असे मानले जाते.
वैज्ञानिकांनी हा छेद घेऊन खडकाचा एक असा नमुना घेतला आहे, ज्याच्या अभ्यासातून अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेण्यास मदत होईल. अटलांटिक महासागराच्या तळाशी असलेल्या ‘अटलांटिस मैसिफ’ नावाच्या पर्वताच्याजवळ हा शोध घेण्यात आला आहे. सुरुवातीला समुद्रतळाशी केवळ 200 मीटर खोदण्याची योजना बनवण्यात आली होती; मात्र वास्तवात याठिकाणी 1268 मीटर उत्खनन करण्यात आले. या ओशन ड्रिलिंगमुळे एक नवा रॉक कोअर समोर आला आहे, ज्याच्या अभ्यासातून पृथ्वीच्या बाह्य स्तराचा विकास कसा झाला, तसेच पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली हे जाणून घेण्यास मदत होईल. पृथ्वीच्या विभिन्न स्तरांमध्ये बाहेरचा एक ठोस, खडकाळ स्तर, खाली असणारे मेंटल आणि सर्वात आतील कोअर यांचा समावेश होतो. कार्डिफ युनिव्हर्सिटीतील जोहान लिसेनबर्ग यांनी सांगितले की, आतापर्यंत आपल्याला मेंटलच्या काही तुकड्यांपर्यंतच जाता आलेले आहे; मात्र अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे समुद्रतळाशी आवरण खुले आहे. ‘अटलांटिस मैसिफ’ हे ठिकाणही असेच आहे. याच्या आसपास सक्रिय ज्वालामुखी हालचाली आहेत. येथे ज्वालामुखीमुळे मेंटलचा अनेक भाग सातत्याने वर येत असतो. हे मेंटल सूक्ष्म जीवांच्या विकासासाठी हातभार लावते. ज्यावेळी सागरी पाणी मेंटलमध्ये खोलवर झिरपते, त्यावेळी उष्ण तापमानामुळे मिथेनसारखी रासायनिक संयुगे निर्माण होतात. हे घटक हायड्रोथर्मल वेंटच्या माध्यमातून वरती सरकतात आणि सूक्ष्मजीवांच्या विकासासाठी इंधनासारखे काम करतात.