वॉशिंग्टन :
पृथ्वीवर ज्यावेळी टी-रेक्स हे सर्वात मोठे मांसाहारी डायनासोर वावरत होते त्याच्याही आधीच्या काळातील जीवाणू आता समुद्रतळाशी पुन्हा सक्रिय झाले आहेत. तब्बल दहा कोटी वर्षे गाडले गेलेले हे जीवाणू जपानी संशोधकांनी पुन्हा सुप्तावस्थेतून बाहेर आणले आहेत.
या दहा कोटी वर्षांच्या काळात डायनासोरचे साम—ाज्य नष्ट झाले. पृथ्वीवरील अनेक खंड वेगवेगळे झाले आणि धरतीवर अनेक स्थित्यंतरे घडली. याच काळात माणसाचा विकास झाला आणि आता माणसानेच या सूक्ष्म जीवांना पुन्हा नवे जीवन दिले आहे. हे एकपेशीय सूक्ष्म जीव इतकी वर्षे तग धरून राहिले, याचे संशोधकांनाही आश्चर्य वाटत आहे. 'जोईडीस' नावाच्या ड्रिल शिपच्या सहाय्याने हे जीवाणू असलेले नमुने गोळा करण्यात आले होते. दहा वर्षांपूर्वी महासागराच्या तळाशी ड्रिल करून हे नमुने आणण्यात आले. त्यासाठी दक्षिण प्रशांत महासागरात वीस हजार फूट खोलीवर असलेल्या तळात 328 फूट खोल ड्रिल करण्यात आले होते. महासागरातील या भागात पोषक तत्त्व तसेच ऑक्सिजन अतिशय तुरळक प्रमाणात असतो. अशा ठिकाणी जीवसृष्टीचे अस्तित्व असणे अशक्य मानले जाते. तिथे हे जीवाणू आढळले होते.