लंडन : तन-मनाच्या विश्रांतीसाठी आणि आरोग्यासाठी सात-आठ तासांची गाढ झोप अत्यावश्यक असते. मात्र, सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना पुरेशी झोप घेता येत नाही. अतिरिक्त कामामुळे किंवा दुसर्या कोणत्याही कारणामुळे आठवड्यात झोपेची वेळ विस्कटली की पुढचा पूर्ण दिवस बिघडल्यासारखाच होतो. त्यात वीकेंडला काही लोक आठवड्यातील झोप भरून काढण्यासाठी जास्त वेळ झोपतात. परंतु, अशा स्लीप रुटीनमुळे आपल्या शरीरावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या अलीकडील अभ्यासात असे सुचवले आहे की, वीकेंडच्या झोपेमुळे हृदयविकाराचा धोका 20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. कामामुळे संपूर्ण आठवड्यामध्ये पुरेशी झोप न मिळणार्यांसाठी हा शोध आशादायी आहे. दुसरीकडे तज्ज्ञांनी म्हटले आहे की, तुम्ही दररोज जरी फक्त एक तासाची झोप कमी घेतली, तरी त्यातून बरे होण्यासाठी तुम्हाला चार दिवस लागू शकतात. या परस्परविरोधी दृष्टिकोनांमुळे, शनिवार व रविवारची झोप आठवड्यातील झोपेची कमी भरून काढू शकते की नाही, यावर अजूनही वादविवाद कायम आहे. अर्थात ‘वीकेंड’ची निवांत झोप ही दीर्घकाळ झोपेच्या अनियमितपणामुळे उद्भवलेले काही नकारात्मक परिणाम कमी करण्यात मदत करू शकते; जसे की, हृदयविकाराचा धोका. अर्थात, यात अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. वीकेंडला पुरेशी झोप घेतल्याने शरीरातील सी-रिअॅक्टिव्ह प्रोटिनसारखे मार्कर कमी होऊन जळजळ कमी होऊ शकते, जे हृदयरोगाशी निगडित आहेत. तसेच ही ‘कॅच अप स्लीप’ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. तसेच ते कॉर्टिसॉलसारख्या स्ट्रेस हॉर्मोन्स नॉर्मल करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, स्लीप रिकव्हरी इन्सुलिन संवेदनशीलता आणि चयापचय कार्य सुधारू शकते, तसेच हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. पुरेशी झोप स्वायत्त मज्जासंस्थेतील संतुलन पुनर्संचयित करते, जे हॉर्ट रेट आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करते.