गुरूच्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता कमी

गुरूच्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता कमी

वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरू. शनीप्रमाणेच गुरूचेही अनेक चंद्र आहेत. त्यापैकी युरोपासारखे काही चंद्र नेहमीच खगोलशास्त्रज्ञांच्या कुतूहलाचा विषय बनलेले असतात. युरोपावर जीवसृष्टीची शक्यता असू शकते, असे आतापर्यंत मानले जात होते. याचे कारण म्हणजे युरोपावर असलेले पाणी आणि ऑक्सिजनचे अस्तित्व. मात्र आता एका नव्या संशोधनातून दिसून आले आहे की, युरोपावर जीवसृष्टीची शक्यता नाही!

नव्या संशोधनात आढळले की, जीवसृष्टीला पुरेसा ठरेल इतका ऑक्सिजन गुरूच्या या चंद्रावर निर्माण होत नाही. गुरूभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या जुनो अंतराळ यानाने दिलेल्या ताज्या आकडेवारीवरून याबाबतची माहिती समोर आली आहे. या चंद्राबाबत स्पष्ट न झालेली माहिती म्हणजे तेथील ऑक्सिजनचे प्रमाण. ताज्या आकडेवारीवरून दिसून येते की, तिथे पुरेसा ऑक्सिजन नाही. 'नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 2022 मध्ये जुनो यानाने गुरू व त्याच्या चंद्रांभोवती भ्रमण करीत असताना ही माहिती गोळा केली होती.

या डेटाचा आता वापर करण्यात आला आहे. प्रिंसटन युनिव्हर्सिटीमधील जेमी सजाले आणि त्यांच्या टीमने हे संशोधन केले. त्यांनी सांगितले की, युरोपाचा पृष्ठभाग मोठ्या प्रमाणात हायड्रोजन वायू सोडतो. मात्र प्रति सेकंद केवळ 18 किलोग्रॅम ऑक्सिजन निर्माण करतो. आधीच्या कॉम्प्युटर मॉडेलद्वारे अनुमानित सुमारे एक हजार किलो प्रति सेकंद ऑक्सिजनच्या तुलनेत हे अतिशय कमी प्रमाण आहे. अर्थात तरीही तेथील स्थिती जीवसृष्टीला अनुकूल ठरू शकते असे फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे खगोलशास्त्रज्ञ मनस्वी लिंगम यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news