

लक्झमबर्ग : जागतिक स्तरावर गर्भश्रीमंत देश म्हटले, तर अमेरिका, चीन, जपान, जर्मनी नजरेसमोर झळकतील. आता त्या देशातही गरिबांची संख्या कमी अजिबात नाही. पण, लक्झमबर्ग हा असा देश आहे, जिथे केवळ अगदी गर्भश्रीमंत, कोट्यधीश लोकच राहतात. तेथे गरिबी औषधासाठीही सापडणार नाही. कमाईच्या बाबतीत हा देश अन्य शक्तिशाली देशांच्या तुलनेत बराच पुढे आहे. येथील प्रत्येक व्यक्तीकडे भरपूर पैसा आहे. पण, तरीही येथील लोक केवळ अव्वाच्या- सव्वा खर्च टाळण्यासाठी शेजारी देशाकडे पळ काढत आहेत, जेणेकरून तेथे कमी पैशात राहता येईल आणि याचे कारणही तितकेच रंजक आहे.
लक्झमबर्ग अमेरिकेतील सर्वात छोटे राज्य आयर्लंडपेक्षाही छोटे आहे. या देशात जेमतेम 6.60 लाख लोक राहतात. मात्र, येथील जवळपास प्रत्येक व्यक्ती कोट्यधीश आहे. या सर्वांकडे प्रचंड, वारेमाप पैसा आहे. मात्र, मागील काही वर्षांत येथील राहणीमान इतके सुधारले आहे की, यामुळे या देशात टिकणे देखील अवघड होऊ लागले आहे. याचमुळे पैसे वाचवण्यासाठी येथील लोक अन्य ठिकाणी जाऊन राहत आहेत.
तूर्तास, लक्झमबर्गमध्ये घर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी देखील खूपच पैसे खर्च करावे लागतात. येथे दोन बेडरूमचा फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी महिन्याकाठी 2 हजार युरो अर्थात चक्क 1.76 लाख रुपये मोजावे लागतात. लक्झमबर्गमध्ये नोकरी असेल तरच तेथे राहणे परवडू शकते, अशी सध्याची स्थिती आहे.
2019 मध्ये लक्झमबर्ग जगातील असा पहिला देश बनला, जेथे सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात आली. तेथे सरकारी रेल्वे, ट्रॉम, बससाठी अजिबात पैसे मोजावे लागत नाहीत. देशातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, हा त्यामागील विचार होता. युरोपमधील अन्य देशांच्या तुलनेत लक्झमबर्गमध्ये प्रति व्यक्ती कारची संख्या अधिक आहे. येथे 60 टक्के लोक ऑफिसला जाण्यासाठी कारचा वापर करतात. केवळ 19 टक्के लोक सरकारी वाहनांचा वापर करतात. मात्र, महागाईचे चटके येथेही सोसावे लागत असून, आता तर कहरच झाला आहे. लक्झमबर्गमधील लोक येथील महागाई टाळण्यासाठी बेल्जियम किंवा फ्रान्समध्ये राहणे पसंत करतात. बेल्जियम किंवा फ्रान्समधून ते रोज नोकरीसाठी लक्झमबर्गला येतात आणि संध्याकाळ होताच परत आपापल्या ठिकाणी निघून जातात!