जपानमध्ये वृद्ध लोक स्मार्टफोनच्या आहारी!

जपानमध्ये वृद्ध लोक स्मार्टफोनच्या आहारी!

टोकियो : एरव्ही तरुणाई स्मार्टफोनच्या आहारी गेल्याचे 'अ‍ॅडिक्टेड' झाल्याचे आपण समजत असतो; पण जपानमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. तिथे चक्क ज्येष्ठ नागरिकांमध्ये स्मार्टफोनचा वापर वेगाने वाढत आहे. हे ज्येष्ठ लोक आपल्या एकलकोंडेपणाची समस्या दूर करण्यासाठी स्मार्टफोन वापरत असून त्यांना याचे व्यसन जडते. ही सवय एवढ्या गंभीर स्थितीत पोहोचली की, कुटुंबातील सदस्य ऑनलाईन राहण्याचा वेळ मर्यादित करण्याचा सल्ला देतात तेव्हा त्यांच्याशी शत्रुत्व भावनेने वर्तन केले जात आहे.

जपानमध्ये ज्येष्ठ नागरिकांची एकूण संख्या 30 टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे. यापैकी 23 टक्के महिला आणि 17 टक्के पुरुष एकटे राहतात. जपानचे गृह मंत्रालय आणि दळण-वळण मंत्रालयानुसार, जपानमध्ये 60 पेक्षा जास्त वयाचे 80 टक्के लोक स्मार्टफोनचा वापर करतात. हे प्रमाण टी.व्ही. (67 टक्के) पाहणार्‍या आणि पर्सनल कॉम्प्युटरचा (60 टक्के) वापर करणार्‍या ज्येष्ठांच्या तुलनेत जास्त आहे.

मानसोपचारतज्ज्ञ हिरोयुकी योशिताके म्हणाले, मुले वा तरुण स्मार्टफोनचा वापर बहुतांश वेळा गेम खेळण्यासाठी करतात. ज्येष्ठ सोशल साईटस्वर वेळ घालवतात. यामध्ये काही ज्येष्ठ असेही आहेत,ज्यांनी नोकरी करताना मोबाईल फोनचा वापर केला नव्हता. मात्र, निवृत्तीनंतर ते पूर्णपणे स्मार्टफोनच्या आहारी गेले आहेत. अमेरिकी लेखक एलेन एन एरोन म्हणाले, स्मार्टफोनवर आभासी अस्तित्व निर्माण करण्याऐवजी ज्येष्ठांनी खर्‍या जगात स्वत:ला समाज, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सहभागी झाले पाहिजे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news