

लंडन : ‘जन्ममृत्युजराव्याधी दुःखदोषानुदर्शनम’ असे गीतेत म्हटलं आहे. अर्थात जन्म, वृद्धावस्था, व्याधी आणि मृत्यू कुणाला चुकलेला नाही. मात्र, जगात तग धरून राहणारे काही जीव आहेत. त्यामध्ये टार्डिग्रेड्स नावाच्या सूक्ष्म जीवांचा समावेश होतो. त्यांचे रूप एखाद्या अस्वलासारखे दिसत असल्याने त्यांना ‘वॉटर बियर’ही म्हणतात. आठ पायांच्या या जीवाची लांबी अवघी 0.5 मिलिमीटर असते. इतक्या छोट्या आकाराचा हा जीव कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहू शकत असल्याने त्याला ‘अमर’ जीवही म्हटले जाते. अर्थात त्याचा मृत्यू होतच नाही असे नाही; पण या जीवाची अत्यंत खडतर स्थितीतही जिवंत राहण्याची क्षमता अफाट असते.
वातावरण कितीही गरम असले किंवा कडाक्याची थंडी असली, तरी अशा वातावरणात हा प्राणी कधीच मरत नाही. अंतराळातही तो आपला जीव वाचवतो. हा सूक्ष्म जीव अत्यंत उष्णतेमध्ये आणि गोठवणार्या थंडीतही मरत नाहीत. ज्या अंतराळात माणसं 2 मिनिटेसुद्धा जगू शकत नाहीत तिथे तो सहज काही वेळ घालवू शकतो. शास्त्रज्ञांनी दीर्घ संशोधनानंतर त्यांची कहाणी शोधून काढली आहे. या प्राण्याबद्दल शास्त्रज्ञ इतकेच सांगतात की पृथ्वीवर कोणतीही आपत्ती आली तरी हा प्राणी आपला प्राण वाचवू शकतो. कारण, त्यांच्यात एक विशेष प्रकारचा जनुक आहे. टार्डिग्रेड्स हिमालयात, समुद्राच्या खोलवर, ज्वालामुखीच्या चिखलात आणि अगदी अंटार्क्टिकामध्ये उणे 80 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात आढळले आहेत. ते पाण्याशिवायही जगू शकतात, असे शास्त्रज्ञांना संशोधनानंतर दिसून आले.
शास्त्रज्ञांना त्याचे रहस्य जाणून आश्चर्य वाटले. कठीण परिस्थितीत हे टार्डिग्रेड्स क्रिप्टोबायोसिसच्या टप्प्यात जातात. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये ते शरीरातील सर्व पाणी काढून टाकतात. त्यांच्या शरीरात फक्त विशेष प्रथिने आणि साखर राहते. जे त्यांच्या पेशी कधीही मरू देत नाहीत. मग काही महिने किंवा वर्षांनंतर जेव्हा त्यांना पुन्हा पाणी मिळते तेव्हा ते आपल्या पेशी पुन्हा पाण्याने भरतात. त्यामुळे त्यांना पुन्हा संजीवनी मिळते. याशिवाय आणखी असा एक जीव आहे जो अतिउष्ण आणि थंडीतही तग धरून राहतो. त्याला ‘यती क्रॅब’ किंवा ‘यती खेकडा’ असे म्हणतात. कठीण कवच असलेला हा प्राणी पाहू शकत नाही. समुद्र सपाटीपासून 2,300 फूट खाली हा प्राणी राहतो. येथपर्यंत सूर्यप्रकाशही पोहोचू शकत नाही. त्यांच्या राहत्या ठिकाणाहून 400 अंश सेल्सिअसपर्यंत गरम पाणी बाहेर येते.