शुक्रावरील एका विशिष्ट वायूच्या अस्तित्वावरून तिथे सूक्ष्म जीवांचे अस्तित्व असू शकते असे म्हटले जात आहे. अर्थातच त्याबाबत पुरावे मिळालेले नाहीत. शुक्र हा जीवसृष्टीसाठी अत्यंत प्रतिकूल असा ग्रह असला तरी तिथे असे संकेत मिळाल्याने अन्य खगोलांकडे अधिकच लक्ष गेले आहे.
पृथ्वीच्या शेजारच्या मंगळावर एके काळी जीवसृष्टीला अनुकूल असे वातावरण व वाहते पाणी होते याचे पुरावे मिळालेले आहेत. सध्या 'नासा'चे अनेक रोव्हर तिथे याबाबतचे संशोधन करीत आहेत. पृथ्वी आणि मंगळावरील दिवसाच्या लांबीतही साम्य आहे. तिथे 24.5 तासांचा एक दिवस असतो. मंगळाच्या ध—ुवीय भागात बर्फाचे अस्तित्व आहे. तसेच तेथील वातावरणात मिथेनचाही समावेश आहे. हा मिथेन वायू जैविक क्रियेनेही निर्माण होत असावा असे म्हटले जाते.
गुरूच्या अनेक उपग्रहांपैकी युरोपा या चंद्राकडेही या दृष्टीने पाहिले जाते. सन 1610 मध्ये गॅलिलिओने या चंद्राचा शोध लावला होता. युरोपावर पाण्याचा बर्फ असल्याने तिथे जीवसृष्टीही असावी असे म्हटले जाते. शनीचा चंद्र एन्सिलाडसवरही पाण्याचा बर्फ आहे. तसेच तिथे पृथ्वीप्रमाणेच पाण्याचे समुद्रही आहेत. शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटनला तर 'पृथ्वीचे जुन्या काळातील रूप' म्हटले जाते. पृथ्वीप्रमाणेच तिथे उन्हाळा, पावसाळा असे ऋतुचक्र आहे. टायटनच्या वातावरणात प्रामुख्याने नायट्रोजनचा समावेश आहे. जीवसृष्टीच्या विकासासाठी हा वायू महत्त्वाचा ठरतो.