Earthquakes : छोट्या भूकंपांची मिळणार पूर्वसूचना

earthquakes
earthquakes
Published on
Updated on

सॅन फ्रॅन्सिस्को : आजवर केलेल्या प्रचंड प्रगतीनंतर देखील आताही भूकंपाचा अंदाज करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, शास्त्रज्ञांनीही जिद्द सोडलेली नाही. एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आता भूकंपानंतर येणार्‍या छोट्या भूकंपांचा बिनचूक अंदाज वर्तवणे शक्य होणार आहे.

या प्रणालीमुळे भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या भूकंपांचा अंदाज वर्तवणे शक्य होऊ शकेल, असे चित्र आहे. जगभरात दरवर्षी भूकंपामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो आणि लाखो लोक बेघर होतात. संपत्तीचे अतोनात नुकसान होते. एक मोठा भूकंप येऊन गेल्यानंतर त्यापाठोपाठ काही धक्के बसत राहतात, असे आजवर सातत्याने आढळून आले आहे. या मोठ्या भूकंपानंतर येणार्‍या छोट्या भूकंपाचा अंदाज वर्तवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल, असा दावा नेचर जर्नलमध्ये प्रकाशित एका शोधनिबंधातून करण्यात आला आहे.

स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे भूकंप तज्ज्ञ लाईला मिजराही यांनी हा शोध अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे याप्रसंगी सांगितले. भविष्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या भूकपांची भविष्यवाणी करण्यासाठी मार्ग यानिमित्ताने खुला होत आहे, असे ते येथे म्हणाले.

या संशोधनानुसार, कॅलिफोर्निया विद्यापीठातील भूकंप अभ्यासकांनी दक्षिण कॅलिफोर्नियात 2008 ते 2021 या कालावधीत आलेल्या हजारो भूकंपांचे मशिन लर्निंग मॉडेल तयार केले आणि त्यात मोठ्या भूकंपानंतर छोटे भूकंप कसे येत गेले, याचा पॅटर्न, त्याची वेळ यावर भर दिला. याचप्रमाणे ब्रिटनमधील ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधकांनी इटलीत 2016-17 या कालावधीत आलेल्या भूकंपांच्या आधारे एआय मॉडेल तयार केले.

जपानमध्ये मागील 30 वर्षांत आलेल्या भूकंपांचाही आणखी एका संशोधनात विस्तृत अभ्यास करण्यात आला असून या तिन्ही अभ्यासांतील निष्कर्ष भूकंपाच्या पॅटर्नशी जोडले असता त्यात बरेच साम्य आढळून आले आहे. अमेरिकेतील भूगर्भ विज्ञान विभाग आता भूकंपाचा अंदाज वर्तवण्यासाठी मशिन लर्निंगचा रीतसर वापर सुरू करणार असल्याचे नेचर जर्नलमध्ये पुढे नमूद केले गेले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news