Public Health Risk | दुष्काळामुळे वाढतोय प्रतिजैविकांना न जुमानणार्‍या ‘सुपरबग्स’चा धोका

Public Health Risk |
Public Health Risk | दुष्काळामुळे वाढतोय प्रतिजैविकांना न जुमानणार्‍या ‘सुपरबग्स’चा धोका
Published on
Updated on

कॅलिफोर्निया : जगभरात हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती केवळ शेती किंवा पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे, तर मानवी आरोग्यासाठीही गंभीर धोका ठरत आहे. ‘कॅलटेक’ संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या ताज्या अभ्यासानुसार, दुष्काळामुळे जमिनीतील अशा सूक्ष्मजीवांची संख्या वाढते जे प्रतिजैविकांना (अँटिबायोटिक्स) दाद देत नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, हे जमिनीतील ‘सुपरबग्स’जीवाणू आपले ‘प्रतिरोधक जनुके’ मानवी संसर्ग पसरवणार्‍या घातक जीवाणूंना हस्तांतरित करू शकतात.

निसर्गतः मातीमध्ये राहणारे सूक्ष्मजीव एकमेकांशी अस्तित्वाची लढाई लढत असतात. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ते ‘अँटीबायोटिक्स’ तयार करतात. संशोधक डायन न्यूमन आणि शाओयू शान यांच्या निरीक्षणाप्रमाणे, जेव्हा जमीन कोरडी पडते किंवा दुष्काळ पडतो, तेव्हा या सूक्ष्मजीवांमधील जगण्याची स्पर्धा तीव— होते. अमेरिकेसह चीन आणि स्वित्झर्लंडमधील शेती, गवताळ प्रदेश आणि जंगलांच्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, कोरड्या हवामानात प्रतिजैविकांना रोखणार्‍या जनुकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते.

संशोधनात असे आढळले आहे की, जमिनीतील जीवाणूंमध्ये आढळणारी काही प्रतिरोधक जनुके रुग्णालयातील रुग्णांमध्ये आढळणार्‍या घातक ‘पॅथोजेन्स’मध्येही दिसून आली आहेत. जीवाणू ‘हॉरिजॉन्टल जीन ट्रान्स्फर’ नावाच्या प्रक्रियेद्वारे जनुकीय माहितीची अदलाबदल करतात. यामुळे जमिनीतील जीवाणूंनी विकसित केलेली रोगप्रतिकारक शक्ती सहजपणे मानवी शरीरात संसर्ग करणार्‍या जीवाणूंमध्ये पोहोचू शकते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2019 च्या आकडेवारीनुसार, प्रतिजैविक प्रतिरोधक शक्तीमुळे दरवर्षी सुमारे 12.7 लाख लोकांचा थेट मृत्यू होतो, तर 49.5 लाख मृत्यूंमध्ये याचा मोठा वाटा असतो. ‘जगाचा कोणताही कोपरा यापासून सुरक्षित नाही,’ असे या अभ्यासाच्या मुख्य लेखिका डायन न्यूमन यांनी सांगितले. ‘जर जगाच्या एका भागात एखादा घातक जीवाणू तयार झाला, तर तो वेगाने सर्वत्र पसरतो. त्यामुळे तुम्ही कुठेही राहत असलात, तरी ही चिंतेची बाब आहे.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news