बटाट्यांची हानी करणार्‍या नव्या जीवाणूंचा शोध

बटाट्यांची हानी करणार्‍या नव्या जीवाणूंचा शोध
Published on
Updated on

वॉशिंग्टन : बटाट्याचे कुरकुरीत वेफर्स खायला कुणाला आवडत नाहीत? अशा मसालेदार वेफर्सनी संपूर्ण बाजारपेठ व्यापून टाकली आहे. वेफर्सच्या उद्योगात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, याच वेफर्स उद्योगावर एक नैसर्गिक संकट घोंगावू लागले आहे. या संकटामुळे शास्त्रज्ञदेखील धास्तावले आहेत. जगभरात बटाट्याच्या चिप्सची मोठी बाजारपेठ आहे. जेव्हा बटाटा पिकावर परिणाम होतो तेव्हा सर्वात आधी चिप्स उद्योगाला फटका बसतो. आता एका नवीन संशोधनानुसार, अज्ञात जीवाणू बटाटा पिकाची नासाडी करीत आहेत. अमेरिकेत हे नवीन जीवाणू सापडले आहेत. अगदी युरोपमध्येही बटाटा पिकांवर बॅक्टेरिया आधीच कहर करतोय. ही समस्या वाढली तर जगभरात चिप्सचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटत आहे.

अमेरिकेतल्या पेन स्टेटमधल्या संशोधकांनी बटाटा पिकाचे नुकसान करणार्‍या जीवाणूंचा एक नवीन प्रकार शोधून काढला आहे. अमेरिकेतील बटाटा उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे जगभरातील चिप्स उत्पादनात फरक पडू शकतो. अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातही बटाट्याचं उत्पादन घेतलं जातं, जिथं या जीवाणूचा बटाटा पिकावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते, या जीवाणूंमुळे बटाट्याच्या पिकात बॅकलेग आणि मऊ रॉटसारखे रोग होतात. यामुळे खराब बटाटे तयार होतात. शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, 26 वेगवेगळ्या शेतांमधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये बटाटे खराब झाल्याचे आढळून आले. अभ्यासात शास्त्रज्ञांनी 456 नवीन जीवाणू नमुने ओळखले आहेत. यातील अनेक जीवाणू बटाटा पिकासाठी अत्यंत घातक आहेत.

संशोधनात डिकेया सारखी स्ट्रेन आणि पेक्टोबॅक्टेरियमच्या सहा प्रजातींचाही समावेश आहे. यापैकी एक, पेक्टोबॅक्टेरियम अमेरिकेत यापूर्वी कधीच दिसला नव्हता. या संसर्गाची व्याप्ती अमेरिकेबाहेरही वाढू शकते अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील बटाटा पिकावर आलेलं संकट जगासाठी धोक्याची घंटा आहे. कारण बटाटा ही केवळ एक भाजी नाही. याचा परिणाम चिप्स उद्योगावर होणार आहे. त्याचबरोबर हे जीवाणू युरोपवरही परिणाम करत आहेत, हे नाकारता येणार नाही. हा अभ्यास सिस्टेमॅटिक अँड अप्लाईड मायक्रो-बायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. सध्या नवीन आणि अज्ञात जीवाणूंवर संशोधन सुरू आहे, त्यासोबतच त्याचा फैलाव रोखण्यासाठी उपायही शोधले जात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news