वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी आता पृथ्वीच्या आकाराच्या अशा ग्रहाचा शोध लावला आहे, ज्याचे वातावरण त्याच्या तार्यापासून येणार्या रेडिएशनने नष्ट करून टाकले आहे. अर्थातच, अशा ग्रहावर जीवसृष्टीची शक्यता नाही. मात्र, तरीही संशोधकांना या ग्रहामध्ये रस आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आपल्या सौरमालिकेबाहेरील एखाद्या ग्रहाची भूगर्भीय रचना जाणून घेण्यासाठी या ग्रहाची मदत होऊ शकते.
या बाह्यग्रहाचे नाव 'स्पेक्युलूस-3 बी' असे आहे. हा खडकाळ पृष्ठभूमीचा ग्रह पृथ्वीपासून 55 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याचे आपल्या तार्यापासूनचे अंतर अतिशय कमी असल्याने तो केवळ 17 तासांमध्येच आपल्या सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. अर्थात, त्याच्यावरील वर्ष अवघ्या सतरा तासांचेच असते. मात्र, या ग्रहावरील दिवस-रात्रीला अंत नाही. हा ग्रह आपल्या तार्याच्या गुरुत्वाकर्षणाशी घट्टपणे बांधला गेलेला आहे, असे संशोधकांना वाटते.
पृथ्वीचा चंद्रही असाच पृथ्वीशी बांधलेला आहे. या ग्रहाची एक बाजू नेहमी त्याच्या तार्याच्या दिशेने असते व तिथे सतत दिवसच असतो, तर दुसरी बाजू नेहमीच विरुद्ध दिशेला व काळोखात असते. त्याच्या तार्याचे वय 7 अब्ज वर्षांचे आहे. हा एक जुना लाल खुजा तारा आहे. त्याचा आकार आपल्या ग्रहमालिकेतील गुरू ग्रहाइतका आहे. त्याच्यावरून येणार्या रेडिएशनने हा ग्रह अक्षरशः भाजून निघतो व त्याच्यावरील तापमान आपल्या ग्रहमालिकेतील शुक्र ग्रहाप्रमाणे अधिक आहे. 'नेचर अॅस्ट्रॉनॉमी' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.