

वॉशिंग्टन : जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने खगोलशास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाच्या अगदी सुरुवातीच्या काळातील एका नव्या ताऱ्यांनी प्रकाशमान झालेल्या ‘रिंग गॅलेक्सी’चा शोध लावला आहे. महास्फोटाच्या (बिग बँग) अवघ्या २.१ अब्ज वर्षांनंतर अस्तित्वात आलेली ही आतापर्यंत शोधली गेलेली सर्वात दूरची रिंग गॅलेक्सी ठरली आहे.
‘GS18660’ असे नाव देण्यात आलेली ही रिंग गॅलेक्सी दोन आकाशगंगांच्या आपापसातील धडकेतून निर्माण झाली असावी, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे. ८ सप्टेंबर रोजी ‘ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स’ या नामांकित जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. युनायटेड किंगडममधील मँचेस्टर विद्यापीठातील बाह्यगॅलेक्सी खगोलशास्त्र प्राध्यापक क्रिस्टोफर कॉनसेलिक (जे या अभ्यासात थेट सहभागी नव्हते) यांनी सांगितले की, अशा प्रणालींचा कालावधी पाहता विलीनीकरणाचा असा पुरावा मिळणे अतिशय दुर्मीळ आहे. सुरुवातीच्या विश्वात आकाशगंगांमधील परस्परक्रिया सामान्य असल्या, तरी अशा वलयाकार प्रणालींची निर्मिती क्वचितच होते.
कॉनसेलिक यांच्या मते, ही आकाशगंगा प्रणाली अतिशय अनोखी असून, ती आकाशगंगांच्या सुरुवातीच्या निर्मितीबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकते. हबल स्पेस टेलिस्कोपच्या जुन्या प्रतिमांमध्ये GS18660 ही आकाशगंगा काहीशी ताणलेली दिसत होती, ज्यामुळे वैज्ञानिकांचे तिच्याकडे लक्ष वेधले गेले. या संदर्भात बोलताना, स्पॅनिश ॲस्ट्रोबायोलॉजी सेंटरचे पोस्टडॉक्टरल संशोधक आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक मिशेल पेर्ना यांनी सांगितले, ‘‘आम्ही सुरुवातीला GS18660 कडे विशेषतः 'रिंग गॅलेक्सी' म्हणून पाहिले नव्हते; परंतु जेव्हा आम्ही JWST च्या ‘निअर-इफ्रारेड स्पेक्ट्रोग्राफ’ (Near-Infrared Spectrograph) उपकरणाद्वारे तिचे निरीक्षण केले, तेव्हा त्यातील अत्यंत सूक्ष्म तपशीलांनी तिची ठळक वलयाकार रचना जगासमोर आणली. यामुळे आम्हाला तिन्ही परिमाणांमध्ये (Three dimensions) या गॅलेक्सीचा सखोल अभ्यास करणे शक्य झाले.’’