

न्यूयॉर्क : उतारवयात अनेक लोकांना अल्झायमरचा हा विस्मृतीशी संबंधित मेंदूचा विकार जडतो. अशा आजारांवर रामबाण उपचार नसल्याने रुग्णाची अवस्था वाईट होत जाते. मात्र, त्यावर सातत्याने नवे संशोधन सुरू आहे. आता संशोधकांनी एक असे जनुकीय रूप शोधले आहे जे सुरुवातीच्या अल्झायमरच्या गंभीर स्वरूपाला अटकाव निर्माण करते. त्यामुळे अल्झायमरला रोखण्यासाठी किंवा त्याचा वेग कमी करण्यासाठी एक चांगली उपचार पद्धती विकसित होऊ शकेल अशी आशा संशोधकांना वाटू लागली आहे.
ऑटोसोमल डॉमिनंट अल्झायमर्स डिसीज (एडीएडी) या अल्झायमरच्या एका रूपापासून संरक्षण देऊ शकणारे हे आतापर्यंत शोधलेले दुसरेच जीन व्हेरिएंट आहे. अनुवंशाने येणार्या जेनेटिक म्युटेशनने किंवा जनुकांमधील बदलांमुळे हा आजार निर्माण होत असतो. अशा लोकांमध्ये चाळीशीतच डिमेन्शियाची लक्षणे दिसू लागतात, अशी माहिती हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील बायोमेडिकल संशोधक डॉ. जोसेफ अर्बोलेडा-व्हेलास्कीझ यांनी दिली. हे लोक क्वचितच वयाची साठी ओलांडू शकतात असेही त्यांनी सांगितले. अशा 'एडीएडी'ला कारणीभूत ठरणारे जेनेटिक म्युटेशन घेऊनच जन्माला आलेल्या एका कोलंबियन माणसावर संशोधकांनी लक्ष ठेवले होते. या माणसामध्ये संबंधित जनुक होते; पण मात्र तो या आजाराला बळी न पडता सुरक्षित राहिला.
अगदी वयाच्या साठीनंतरही त्याची प्रकृती उत्तम राहिली. वयाच्या 72 व्या वर्षी त्याच्यामध्ये अल्झायमर्सची किरकोळ लक्षणे दिसून आली. वयाच्या 73 व्या वर्षी हा माणूस डिमेन्शियाशी संबंधित नसलेल्या वेगळ्याच कारणामुळे मृत्युमुखी पडला. एकंदरीत या माणसाला आयुष्यभर धोकादायक जेनेटिक म्युटेशनमुळे त्रास सहन करावा लागला नाही. हे कसे घडले याचा शोध घेण्यात आल्यावर जनुकांचे काही विशिष्ट व्हर्जन्स यासाठी जबाबदार असल्याचे संशोधकांना दिसून आले. याच जनुकांमुळे त्याचे अल्झायमरच्या गंभीर आजारापासून संरक्षण झाले होते.