बीजिंग : एके काळी या पृथ्वीतलावर डायनासोरचे साम्राज्य होते. 6.5 कोटी वर्षांपूर्वी एका लघुग्रहाच्या धडकेनंतर निर्माण झालेल्या विपरीत परिस्थितीत डायनासोरसह अन्यही अनेक प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या. मात्र जगभरात वेगवेगळ्या प्रजातींचे अनेक डायनासोरचे जीवाश्म सापडलेले आहेत. त्यांच्या पावलांच्या खुणाही अनेक ठिकाणी दिसून आल्या आहेत. आता चीनमध्ये युनान प्रांतातही डायनासोरच्या पावलांच्या मोठ्या संख्येने खुणा दिसून आल्या आहेत.
युनान प्रांताच्या कोंगलोंग शान शहरात या खुणा आढळून आल्या. ज्याठिकाणी या खुणा आढळल्या त्या साईटच्या जिओलॉजिकल एज मेजरमेंटने हे समजले की, डायनासोरच्या खुणा असलेला खडक सुमारे 12 कोटी वर्षांपूर्वीचा आहे. त्यावर आजही डायनासोरच्या पावलांचे ठसे स्पष्टपणे दिसून येतात. याठिकाणी आतापर्यंत चारशेपेक्षा अधिक डायनासोरच्या पावलांचे ठसे आढळले आहेत.
या खुणा सर्वप्रथम स्थानिक लोकांच्या नजरेत आल्या होत्या. त्याची माहिती संशोधकांपर्यंत पोहोचताच, रिसर्च टीमने तिथे जाऊन सर्व्हेक्षणाचे काम सुरू केले. विशेष म्हणजे कोंगलोंग शान टाऊन हे 1990 च्या दशकापासूनच डायनासोरच्या पाऊलखुणांसाठी ओळखले जात आहे. तिथे सातत्याने नव्या नव्या खुणा आढळून येत असतात. या खुणा जिथे आढळतात, त्या ठिकाणाला आता 'डायनासोरचा डोंगर' असे म्हटले जाते!