वॉशिंग्टन ः कर्करोगावरील प्रभावी उपचारासाठी सातत्याने संशोधन होत असते. अमेरिकेत मिशिगन विद्यापीठाने त्यासाठी एक वेगळी उपचार पद्धती शोधलेली आहे. कर्करोगावर रुग्णानुसार वेगळे उपचार करण्याची सोय यामध्ये असून या संशोधनात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी रुग्णांच्या कर्करोग पेशी प्रयोगशाळेत वाढवण्याचा अभिनव मार्ग शोधला असून त्यामुळे उपचार शोधून काढणे सोपे झाले आहे.
मिशिगन विद्यापीठाने हे तंत्र विकसित केले असून पूवीर्र्च्या पद्धतींपेक्षा तीन पट प्रभावी आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, कर्करोगाच्या संशोधनात हे मोठे पाऊल पडले आहे. कर्करोगाच्या पेशी या रुग्णाच्या रक्तातून फिरत असतात. मेटॅस्टॅटिसमुळे शरीरात कर्करोगाची वाढ होऊन नव्वद टक्के रुग्ण मरतात. रक्तात फिरणार्या या कर्करोगपेशी या गाठीतून सटकून रक्तात येत असतात. त्या पेशींमध्ये जनुकीय माहिती बरीच असते व त्यामुळे कर्करोगावर मनोवांच्छित उपचार करणे शक्य होणार आहे. शिवाय उपचारांचे पर्यायही वाढणार आहेत. प्रत्येक रुग्णासाठी वेगळी उपचार पद्धती तयार करणे त्यामुळे शक्य होईल.
रक्तात फिरणार्या कर्करोग पेशी या रक्ताबरोबर असल्याने त्या मिळवण्याकरिता उतींबरोबर असलेल्या पेशींइतकी बायॉप्सी इतकी कठीण पद्धत वापरावी लागत नाही. फक्त या पेशींच्या माध्यमातून उपचार पद्धती विकसित करणे कठीण असते कारण ज्या रुग्णांचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात असतो त्यांच्या रक्तात या पेशी फार मोठ्या प्रमाणात सापडत नाहीत. किमान 73 टक्के रुग्णात अशा पेशी असतात, त्यामुळे यशाचे प्रमाण पूर्वीच्या पद्धतींच्या पेक्षा तीन पट जास्त असते. वैज्ञानिकांच्या मते कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्णांमध्ये विश्वासार्ह मार्गाने या कर्करोग गाठीतील पेशी मिळवता येतात.
यामुळे कर्करोग संशोधनाची दिशाच बदलली जाणार असून मिशिगन विद्यापीठाच्या सुनीता नागरथ यांनी त्यात मोलाचे संशोधन केले आहे. त्या रासायनिक अभियांत्रिकीतील सहायक प्राध्यापक आहेत. त्यांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढण्यात मोठी भूमिका पार पाडली आहे. पेशींचे पेट्रीडिशमध्ये जे कल्चर तयार केले जाते त्याबाबतची ही पद्धत असून त्यात प्रत्येक व्यक्तीचा कर्करोग अगदी लवकरच्या टप्प्यात निदान केला जाऊ शकतो असे नागरथ यांनी सांगितले. यात कर्करोगपेशी औषधांना कसा प्रतिकार करतात हे दिसते व त्यामुळे औषधांमध्ये सुधारणा करता येईल, असे नागरथ यांचे म्हणणे आहे.