यकृत हा मानवी शरीरातील महत्त्वाचा भाग असून, यकृताद्वारे अनेक क्रिया पार पाडल्या जातात. यकृत शरीरातील अनेक जीवनावश्यक कार्य पार पाडत असल्याने, यकृताला बाधा झाल्यास अनेक गंभीर परिणाम भोगावे लागतात.
प्राथमिक टप्प्यावरील यकृताचा कर्करोग, हा एक हानिकारक ट्यूमर आहे, जो यकृतामध्ये उद्भवतो. 'हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा' हा प्रौढांमधील यकृत कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. यकृताचा कर्करोग लवकर ओळखणे अनेकदा कठीण होते. कारण शेवटच्या टप्प्यात येईपर्यंत लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे उच्च धोका असलेल्या लोकांसाठी वेळोवेळी तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
यकृताच्या पेशींच्या डीएनएमध्ये बदल किंवा उत्परिवर्तन झाल्यास यकृताचा कर्करोग होतो. यामुळे पेशी अनियंत्रितपणे वाढू शकतात आणि कर्करोगाच्या पेशींनी ट्यूमर तयार होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये, यकृताच्या कर्करोगामागील कारण ओळखता येण्याजोगे असते, जसे की क्रॉनिक हेपॅटायटीस संक्रमण.
यकृत कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, बहुसंख्य व्यक्तींना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. तथापि, जेव्हा दिसून येतात, तेव्हा अनपेक्षित वजन कमी होणे, भूक मंदावणे, पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे, उलट्या तसेच मळमळ होणे, अशक्तपणा आणि थकवा जाणवणे, ओटीपोटात सूज येणे, त्वचा पिवळी पडणे यांचा समावेश असू शकतो.
यकृत कर्करोगाचा धोका अनेक घटकांमुळे वाढू शकतो. यामध्ये हिपॅटायटीस बी विषाणू किंवा हिपॅटायटीस सी विषाणूसह होणार्या संक्रमणाचा समावेश आहे. हे दोन्हीही यकृताचा कर्करोगाचा धोका वाढवतात. सिरोसिस, एक गंभीर आणि अपरिवर्तनीय स्थिती आहे, जी यकृतावर होणार्या जखमांनी ओळखली जाते. काही आनुवंशिक यकृत रोग, जसे हेमोक्रोमॅटोसिस विल्सन रोग आणि मधुमेहामुळे देखील कर्करोग होऊ शकतो. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज, यकृतामध्ये फॅटस् जमा होणे हा आणखी एक जोखमीचा घटक आहे. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृताचे कायमचे नुकसान होऊ शकते आणि यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
यकृताच्या कर्करोगासाठी वेळीच तपासणी करणे महत्त्वाचे आहे. यकृताच्या कर्करोगाचे लवकर निदान केल्याने जगण्याचे प्रमाण वाढते. त्याची सुरुवातीची लक्षणे थकवा किंवा भूक न लागणे यांसारख्या सामान्य आजारांसारखी असल्याने निदानामध्ये विलंब होऊ शकतो. यासाठी नियमित तपासणी गरजेची आहे. वेळीच तपासणी न केल्यास हा आजार प्राणघातक ठरु शकतो. प्रगत अवस्थेपर्यंतही यकृताच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. अल्ट्रासाऊंड स्कॅन आणि अल्फा-फेटोप्रोटीन (एएफपी) साठी रक्त चाचण्या आणि इमेजिंग तंत्र यासारख्या चाचण्या डॉक्टरांना रुग्णाच्या यकृताबद्दल अचूक माहिती देतात. अल्ट्रासाऊंड परिक्षण हे ही तपासणीची पहिली पायरी असते. सीटी स्कॅन आणि एमआरआयमुळे ट्यूमरच्या आकार आणि स्थान समजण्यास मदत होते. याकरिका नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.