

मुंबई : 'धुरंधर' चित्रपटात जसा 'रहमान डकैत' हा शत्रूला कानोकान खबर लागू न देता शिकार करणारा सर्वात मोठा शिकारी दाखवला होता, हुबेहूब तसाच एक धुरंधर शिकारी समुद्राच्या अथांग खोलीत राहतो. या जिवाचे नाव आहे 'सी स्पायडर' (समुद्री कोळी). आपल्या अजब वैशिष्ट्यांमुळे हा जीव वैज्ञानिक जगतात नेहमीच कौतुकाचा विषय ठरला आहे.
पोटाशिवाय आणि फुफ्फुसाशिवाय जगतो!
'पायक्नोगॉनिडा' या वैज्ञानिक वर्गात येणारा हा जीव दिसायला कोळी किंवा खेकड्यासारखा असतो. याच्या शरीराची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे मुख्य शरीर (धड) अत्यंत लहान असते. इतके लहान की, त्यात पोट, हृदय किंवा फुफ्फुस यांसारख्या अवयवांसाठी जागाच उरत नाही. पाचन आणि प्रजोत्पादनाचे अवयव पायात : या जिवाचे अन्न पचवण्याचे अवयव आणि प्रजोत्पादन अवयव त्याच्या शरीरात नसून, त्याच्या लांब सडक पायांमध्ये पसरलेले असतात. सी स्पायडरला श्वास घेण्यासाठी फुफ्फुस किंवा कल्ले नसतात. तो आपल्या पायांच्या त्वचेद्वारे थेट पाण्यातून ऑक्सिजन शोषून घेतो. त्याचे शरीर बहुतांश पारदर्शक असते. सी स्पायडरला दातांची पाटी नसते. त्याऐवजी त्याच्या तोंडाजवळ सुईसारखी एक लांब नळी असते. तो जेलीफिश, सी-ॲनेमोन किंवा स्पंजसारख्या जिवांच्या शरीरात ही सुई अलगद खुपसतो आणि त्यांच्या शरीरातील सर्व रक्त आणि अंतर्गत द्रवपदार्थ चुसून घेतो. ही प्रक्रिया इतकी शांत आणि संथ असते की, समोरच्या जिवाला आपल्या मृत्यूची भनकही लागत नाही.
नराची अनोखी पालकत्वाची भूमिका
सी स्पायडरमध्ये मुलांचे संगोपन करण्याची पद्धत उलटी आहे. मादी केवळ अंडी घालते. त्यानंतर नर ती अंडी गोळा करतो आणि आपल्या पायांवर चिकटवून घेतो. जोपर्यंत अंड्यातून पिल्ले बाहेर येत नाहीत, तोपर्यंत नर त्या अंड्यांना पायांवर घेऊन समुद्रभर फिरतो आणि पिल्लांचे रक्षण करतो. जगभरातील महासागरांमध्ये सी स्पायडरच्या १,३०० हून अधिक प्रजाती आढळतात. काही प्रजातींच्या पायांचा विस्तार तब्बल ७० सेंटिमीटरपर्यंत असू शकतो. करोडो वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेला हा जीव मानवांसाठी मात्र पूर्णपणे निरुपद्रवी आहे.