लंडन : कृत्रिम पाय किंवा तत्सम वस्तू या केवळ माणसासाठीच बनवल्या जातात असे नाही. काही पशू-पक्ष्यांसाठीही अशा प्रकारच्या वस्तूंची सोय करण्यात आलेली आहे. इंग्लंडमधील 'विनी' नावाच्या एका मेंढीसाठीही अशी व्यवस्था करण्यात आली होती. या मेंढीचे मागचे दोन पाय निकामी झाल्यावर तिच्यासाठी खास चाकांची गाडी तयार करून ती कंबरेच्या भागाला जोडली होती. या चाकांच्या सहाय्याने ती चालत असे. आता या मेंढीचा मृत्यू झाला आहे.
मणक्यावर उठलेल्या एका गळूमुळे तिचे मागच्या दोन पायांमधील शक्ती गेली होती असावी असे निदर्शनास आले होते. सफोकच्या पेकफिल्डमधील ही मेंढी जन्मल्यानंतर काहीच दिवसांनी तिच्यामध्ये ही समस्या निर्माण झाली. त्यानंतर तिच्यासाठी ही खास गाडी बनवण्यात आली व ती तिच्या देहाला जोडली गेली. या गाडीच्या सहाय्याने ती आरामात चालत असे. सामान्य मेंढ्यांसारखे आयुष्य जगल्यानंतर आता ही मेंढी मृत्युमुखी पडली आहे. मानवी प्रयत्न व त्यामुळे सुकर झालेले या मेंढीचे जीवन यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. गेल्या शुक्रवारी ती वेदनाग्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर थोड्याच वेळाने तिचा मृत्यू झाला.