Climate Change Impact | मृत समुद्र लागलाय मरणपंथाला

Climate Change Impact
Climate Change Impact | मृत समुद्र लागलाय मरणपंथाला
Published on
Updated on

तेलअविव : एक अथांग पसरलेला गडद निळा समुद्र, किनाऱ्यावर कापसासारखे पांढरे शुभ्र मिठाचे स्फटिक आणि संथ पाण्यात पोहण्याचा आनंद घेणारे पर्यटक... हे चित्र आहे जगातील सर्वात सखोल भूप्रदेश असलेल्या 'डेड सी' (मृत समुद्रा) चे. समुद्रसपाटीपासून सुमारे १,४०० फूट खाली असलेला आणि सर्वसामान्य समुद्रापेक्षा १० पटीने अधिक खारट असलेला हा जलाशय आज स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. दरवर्षी हा समुद्र तब्बल ४ फुटांनी आटत असून, गेल्या ५० वर्षांत त्याचा एकतृतीयांश भाग नष्ट झाला आहे.

बोटीचे कॅप्टन जेक बेन जाकेन सांगतात, ‘हा केवळ निसर्गाचा बदल नाही, तर डोळ्यांदेखत घडणारा एक पर्यावरणीय विनाश आहे.’ समुद्राचे पाणी आटल्यामुळे जमिनीखालील मिठाचे थर विरघळत आहेत, ज्यामुळे अचानक जमीन खचून मोठे खड्डे म्हणजेच ‘सिंकहोल्स’ तयार होत आहेत. एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेले ‘एन गेदी’सारखे रिसॉर्टस्‌ आज याच ‘सिंकहोल्स’मुळे भूतबंगल्यासारखे ओसाड पडले आहेत. येथे आतापर्यंत ६,००० पेक्षा जास्त ‘सिंकहोल्स’ तयार झाले असून, ते भविष्यातील मोठ्या धोक्याची घंटा आहेत.

मानवी हस्तक्षेप आणि हवामान बदल

मृत समुद्राला पाणी पुरवणारी मुख्य ‘जॉर्डन नदी’ इस्रायल, सीरिया आणि जॉर्डन या देशांनी धरणे बांधून आणि पाण्याचे प्रवाह वळवून कोरडी केली आहे. पूर्वी या नदीतून १.३ अब्ज क्युबिक मीटर पाणी समुद्रात यायचे, ते आता अवघे १०० दशलक्ष क्युबिक मीटर उरले आहे. दुसरीकडे, रासायनिक कंपन्यांद्वारे खते आणि खनिजांसाठी होणारे पाण्याचे प्रचंड बाष्पीभवन आणि जागतिक तापमानवाढीमुळे पडणारा दुष्काळ या विनाशाला गती देत आहेत.

हा समुद्र वाचवण्यासाठी तांबड्या समुद्रातून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा ‘सी-टू-डेड सी’ प्रकल्प कागदावर आला; मात्र अब्जावधी डॉलर्सचा खर्च आणि प्रादेशिक राजकीय वादामुळे तो रखडला आहे. पर्यावरणवाद्यांच्या मते, हा समुद्र जुन्या स्थितीत आणणे आता अशक्य असले, तरी त्याचा विनाश रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे आहे. निसर्गाचा हा अनमोल ठेवा टिकवण्यासाठी मानवाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या काळात ‘मृत समुद्र’ फक्त इतिहासाच्या पानातच जिवंत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news