सिंगापूर : असे नेहमी होते की, जिथे आपण फिरायला जातो, तेथे काही खास डिशेस निश्चितपणाने ट्राय करतो. याचे कारण असे की, तेथील लोकप्रिय डिशचा आस्वाद घेणे. आता सध्या सर्वच पदार्थ कोठेही मिळतात. पण, तरीही ज्या-त्या ठिकाणी जी-ती खासियत असलेल्या डिशचा आस्वाद घेणे जवळपास प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. जुंका शिनबा या जपानी महिलेसमवेतही असेच झाले. ती सिंगापूरचे पर्यटन करत असताना एका रेस्टॉरंटमध्ये घुसली आणि तिने आपल्या पसंतीची खेकडा डिश मागवली आणि त्याचा पुरेपूर आनंदही लुटला. पण, ज्यावेळी बिल समोर आले, त्यावेळी तिचा स्वत:वरच विश्वास बसला नाही. कारण, तिने थोडीथोडकी नव्हे तर चक्क
60 हजार किमतीची महागडी डिश किंमत न पाहता मागवली होती.
शिनबा ही यावेळी सिंगापूरमधील प्रसिद्ध रेस्टॉरंट सी फूड पॅराडाईजमध्ये होती. तिने या रेस्टॉरंटची सिग्नेचर डिश अलास्कन किंग चिली क्रॅब ऑर्डर केले. शिनबा 4 निकटवर्तियांसह होती. त्या सर्वांनी या डिशचा पुरेपूर आस्वाद घेतला. त्यांनी जवळपास साडेतीन किलो वजनाचा खेकडा यावेळी पाहता पाहता फस्त केला. या चौघांचे पोट भरल्यानंतरही 3 प्लेट क्रॅब शिल्लक राहिले. त्यानंतर बिल आले 58173 रुपये आणि या चौघांचे चेहरेही पाहण्यासारखे झाले!
केवळ चार जणांच्या लंचचे इतके बिल पाहून भडकलेल्या शिनबाने यावेळी रेस्टॉरंटच्या मॅनेजरशी याबाबत संपर्क साधला आणि त्या मॅनेजरने मेनू कार्डमध्ये त्या डिशची किंमत स्पष्ट मांडलेली असल्याचे सांगितले. आता तो क्रॅब तीन किलोचा होता आणि तो कूक करण्यापूर्वी या चौघांना दाखवण्यातही आला होता. पण, यानंतरही शिनबा पूर्ण बिल देण्यासाठी राजी नव्हती. नंतर तिने यासाठी चक्क स्थानिक पोलिसांना पाचारण केले आणि पोलिसांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर रेस्टॉरंटने 9 हजार रुपयांची सूट दिली आणि 49 हजार रुपये भरून शिनबा व त्यांचे निकटवर्तीय तेथून बाहेर पडले!