लंडन : खाणेपिणे, कपडेलत्ते आणि घर यापैकी अगदी एखादी गोष्टही नसेल, तरी मनुष्यासाठी जगणे हैराण होऊन जाते. आता खाणेपिणे व कपडेलत्ते त्यातुलनेत स्वस्तात मिळू शकतात; पण घर खरेदी करणे यात अतिशय अवघड आणि महागडे ठरते आहे. लाखो रुपयांची तजवीज करून तीही कमी पडत असेल, तर कर्ज घ्यावे लागते. काही लोकांचे तर आयुष्यच कर्ज फेडण्यात जाते आणि आयुष्याच्या उत्तरार्धात कुठे तरी ते कर्जमुक्त होतात. विदेशात मात्र स्वत:चे घर, हा ट्रेंड फारसा नाही, असे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. कर्टनी व नार्टे ही जोडगोळीदेखील यापैकीच एक असून, या जोडीने घर घेण्याऐवजी एक व्हॅन खरेदी केली आहे आणि या व्हॅनमध्येच तिने आपला संसार थाटला आहे.
'द सन' या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, कर्टनी व नाटे यांच्यासह त्यांच्या पाळीव कुत्र्याचे वास्तव्यही याच व्हॅनच्या आसपास असते. त्यांनी या व्हॅनला एखाद्या घरासारखेच सजवले आहे. व्हॅनमध्ये बेड, किचन, फ्रिज, सिंक, टेबल, खुर्ची इतकेच नव्हे, तर एक पोर्टेबल वॉशरूमही आहे. मागील 5 वर्षांपासून ही जोडी व्हॅनमध्ये राहते.
'टिकटॉक' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्हॅनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात कर्टनीने घराऐवजी व्हॅनमध्ये आपण आपला संसार का थाटला आहे, त्याचे कारण विशद केले. मागील 4 वर्षांत केलेल्या बचतीत एखादे घर सहज येऊ शकले असते; पण छत असावे, यासाठी आपण कर्जात बुडून जाणेही योग्य नाही, या विचाराने त्यांनी चार वर्षांपूर्वी व्हॅनमध्ये संसार थाटण्याचा निर्णय घेतला.
घर घेतले असते, तर त्याचे कर्ज फेडण्यात किमान 10 वर्षे निघून गेली असती; पण ते टाळण्यासाठी त्यांनी व्हॅनमध्ये घर थाटण्याला पसंती दिली. आता सोशल मीडियावर ही जोडी आपला संसार कसा आहे, याचे काही व्हिडीओ, छायाचित्रे शेअर करत असतात. या जोडीला इन्स्टाग्रामवर जवळपास 4 लाख लोक फॉलो करत आले आहेत.