

नवी दिल्ली : काही गोड किंवा चटकमटक पदार्थ कधीतरी खाण्याची इच्छा होत असतेच व त्यामध्ये असामान्य असे काहीच नाही. आपल्याला एखादा पदार्थ अचानक खाण्याची खूप इच्छा होते, ज्याला आपण ‘क्रेव्हिंग’ असे म्हणतो. पण, जर आपल्याला सतत एखादा पदार्थ खाण्याची ‘क्रेव्हिंग’ होत असेल, तर तो आरोग्याची समस्या किंवा पौष्टिक कमतरतेचाही संकेत असू शकतो. याविषयी आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे की विशिष्ट पदार्थ खाण्याची सतत इच्छा निर्माण होणे हे काही वेळा शरीरामधील पौष्टिक कमतरतेचेसुद्धा लक्षण असू शकते. तुम्हाला फॅट्सयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा होणे हे मेंदूचे कार्य आणि हार्मोनल संतुलन यासाठी शरीराला ओमेगा-3 आणि ओमेगा-6 ची आणखी आवश्यकता असल्याचे लक्षण असू शकते. त्याशिवाय आहारात ए, डी, ई व के यांसारख्या जीवनसत्त्वांची कमरतासुद्धा असू शकते.
जर तुम्हाला सातत्याने चॉकलेट खाण्याची इच्छा होत असेल, तर तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असू शकते. कारण- कोको हा मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे आणि कोकोच्या बियांपासून चॉकलेट तयार होते. त्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन बी आणि फॅटी अॅसिडचीही कमतरता असू शकते. जर तुम्हाला सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल, तर तुमच्या शरीरमध्ये क्रोमियम, फॉस्फरस किंवा रक्तात साखरेची कमतरता असण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला गोड खाऊन आनंद मिळत असेल, तर तुमच्या शरीरात सेरोटोनिन हार्मोन सक्रिय होऊ शकते आणि तुमचा मूड सुधारू शकतो. त्यामुळे तुम्हाला आनंद देणार्या अधिक गोष्टी करा. जर तुम्हाला खारट पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल, तर तुमच्या शरीरात सोडियमची कमतरता असू शकते. याशिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सुद्धा खारट पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आपल्या आहारात थोडा दुधाचा समावेश करा. त्याशिवाय मॅग्नेशियम आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळेसुद्धा खारट पदार्थ खाण्याची इच्छा वाढू शकते. विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा फक्त पौष्टिक कमतरतेचे लक्षण नव्हे, तर ही गोष्ट आरोग्याच्या समस्येचेसुद्धा संकेत देते. जसे की हार्मोनल असंतुलन, रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असणे, तसेच तणाव किंवा नैराश्य यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.