China Electric Aircraft | चीनच्या इलेक्ट्रिक विमानाचे पहिले यशस्वी मानवयुक्त उड्डाण

China Electric Aircraft |
China Electric Aircraft | चीनच्या इलेक्ट्रिक विमानाचे पहिले यशस्वी मानवयुक्त उड्डाण
Published on: 
Updated on: 

बीजिंग : कल्पना करा की तुम्ही एका विमानातून प्रवास करत आहात, विमानात १९ प्रवासी बसले आहेत, विमान आकाशात हजारो फूट उंचीवर उडत आहे; मात्र त्यासाठी ना पारंपरिक जेट इंजिनची गरज आहे, ना विमान उडवण्यासाठी एव्हिएशन इंधनाचा एक थेंबही जाळला जात आहे. हे विमान पूर्णपणे विजेवर चालत आहे. आतापर्यंत अशी कल्पना केवळ भविष्यातील तंत्रज्ञानाचा एक भाग वाटत होती; पण चीनने ती प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. चीनने १० टन वजनाच्या आपल्या 'CE-25A' या इलेक्ट्रिक कमर्शियल विमानाचे पहिले यशस्वी मानवयुक्त उड्डाण पूर्ण करत, जगासमोर विमान वाहतूक उद्योगाच्या भविष्याची एक नवी झलक सादर केली आहे.

हे केवळ एका नवीन विमानाचे उड्डाण नसून, आगामी काळात जागतिक हवाई वाहतूक, विमान निर्मिती उद्योग आणि ऊर्जा क्षेत्राची संपूर्ण दिशा बदलू शकणाऱ्या तांत्रिक बदलाचे संकेत आहेत. चीनच्या पूर्व शानदोंग प्रांतातील बिनझोउ येथे १४ नोव्हेंबर २०२६ रोजी या विमानाने पहिल्यांदा वैमानिक आणि फ्लाईट टेस्ट इंजिनिअरसह आकाशात झेप घेतली. या उड्डाणादरम्यान विमानात दोन पायलट आणि एक फ्लाईट टेस्ट इंजिनिअर उपस्थित होते. विमानाने १६ मिनिटे ३८ सेकंद आकाशात उड्डाण केले आणि या काळात सुमारे ६०.४ किलोमीटर अंतर पार केले.

चीनची सरकारी विमान निर्माता कंपनी COMAC च्या मते, विमानाच्या सर्व कामगिरीचे निकष अपेक्षेप्रमाणे राहिले. या विमानाचे सर्वात खास वैशिष्ट्य केवळ त्याचा आकार किंवा वजन नसून, ते चालवणारे तंत्रज्ञान आहे. सुमारे १० टन कमाल टेकऑफ वजन असलेल्या या विमानात १९ प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. त्याची काही वैशिष्ट्ये अशीः कमाल पल्ला (Range): ४०० किलोमीटर, क्रूज वेग (Cruise Speed): ३०० किलोमीटर प्रति तास, क्रूज उंची: २,४०० मीटर. यावरून हे स्पष्ट होते की, शहरांदरम्यान लहान आणि मध्यम पल्ल्याच्या हवाई प्रवासासाठी वापरता येतील अशी इलेक्ट्रिक विमाने तयार करण्याची चीनची योजना आहे.

या विमानाकडे बारकाईने पाहिले तर त्याचे तंत्रज्ञान पारंपरिक विमानांपेक्षा बरेच वेगळे दिसून येते. सर्वसाधारणपणे विमानाच्या पंखांवर मोठे इंजिन किंवा प्रोपेलर दिसतात; मात्र CE-25A या विमानाच्या दोन्ही पंखांवर प्रत्येकी पाच असे एकूण दहा इलेक्ट्रिक डक्टेड फॅन बसवण्यात आले आहेत. हे दहा इलेक्ट्रिक फॅन विमानाला पुढे ढकलण्यासाठी आवश्यक असलेला जोर (Thrust) निर्माण करतात. या पंख्यांना बॅटरीतून ऊर्जा मिळते आणि इलेक्ट्रिक मोटरच्या माध्यमातून विमान आकाशात झेपावते. यामध्ये पारंपरिक विमानांप्रमाणे इंधन जाळून इंजिन चालवण्याची यंत्रणा नाही. याच कारणामुळे भविष्यातील 'ग्रीन एव्हिएशन'च्या (पर्यावरणपूरक विमान वाहतूक) दिशेने हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.