

बीजिंग : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असलेल्या पुनर्वनीकरण (Reforestation) प्रकल्पांतर्गत लावलेली झाडे ही नैसर्गिक जंगलांमधील झाडांपेक्षाही अधिक वेगाने वाढत असल्याचे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, वातावरणातील वाढत्या कार्बन डायऑक्साईडला (CO2) ही मानवनिर्मित झाडे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद देत असल्यामुळे हे घडत असावे.
चीन सध्या अतिशय झपाट्याने हिरवागार होत आहे. गोबी आणि टाकलामकान वाळवंटांचा विस्तार रोखण्यासाठी चीनने १९७८ पासून आपल्या ‘ग्रेट ग्रीन वॉल’ प्रकल्पांतर्गत तब्बल ६६ अब्ज (६,६०० कोटी) झाडे लावली आहेत. तसेच, या शतकाच्या मध्यापर्यंत (२०५० पर्यंत) आणखी ३४ अब्ज झाडे लावण्याचे त्यांचे नियोजन आहे. ही नवीन जंगले मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. परंतु, ही जंगले नैसर्गिक जंगलांपेक्षा नक्की कशी वेगळी आहेत, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती चीनमधील पेकिंग विद्यापीठाचे लँडस्केप इकोलॉजिस्ट आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक युहांग लुओ यांनी दिली.
प्रजातींची विविधता, झाडांची घनता आणि त्यांचे वय यांसारखे घटक वाढता कार्बन डायऑक्साईड आणि हवामान बदलाला कसा प्रतिसाद देतात, याचा अभ्यास लुओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. संशोधकांनी जंगलांच्या वाढीचा वेग मोजण्यासाठी सॅटेलाईट (उपग्रह) डेटाचा वापर केला. याद्वारे त्यांनी ‘लीफ एरिया इंडेक्स’ (Leaf Area Index - झाडांच्या पानांची घनता, जी कार्बन शोषून घेण्याचा मुख्य स्त्रोत असते) तपासला. यात एक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण फरक आढळून आला : मानवनिर्मित जंगलांच्या पानांची घनता (Leaf Area) नैसर्गिक जंगलांच्या तुलनेत ६६ टक्के अधिक वेगाने वाढली आहे. यावरून ही झाडे वेगाने वाढत असल्याचे सिद्ध होते.