

कंपाला (युगांडा) : निसर्गातील प्राणी आपल्या समूहाशी किती एकनिष्ठ असतात, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. मात्र, युगांडातील किबाले नॅशनल पार्कमध्ये एक धक्कादायक आणि दुर्मीळ घटना समोर आली आहे. येथील ‘नोगो’ समुदायातील चिंपान्झींमध्ये भीषण ‘गृहयुद्ध’ सुरू झाले असून, एकेकाळी मित्र असलेल्या प्राण्यांनी आता एकमेकांविरुद्ध जीवघेणा संघर्ष पुकारला आहे.
चिंपान्झींच्या वेगवेगळ्या गटांमध्ये अन्नासाठी किंवा पाण्यासाठी संघर्ष होणे ही सामान्य बाब आहे. परंतु, एकाच विशाल समुदायाचे विभाजन होऊन त्यांच्यात असे युद्ध होणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. ‘सायन्स’ या नियतकालिकात गुरुवारी (9 एप्रिल) प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठाचे मानववंशशास्त्रज्ञ आरोन सँडेल आणि त्यांच्या सहकार्यांनी या संघर्षाचे सविस्तर वर्णन केले आहे. सुरुवात (1998-2014) : नोगो समुदायात सुमारे 200 चिंपान्झी होते. सुरुवातीला हे सर्व एकत्र होते; पण हळूहळू त्यांचे लहान-लहान गट तयार होऊ लागले. 2014 पर्यंत काही नर चिंपान्झींचे विशिष्ट गट बनले, जे सतत एकत्र राहू लागले. विभाजन (2015) : 2015 च्या सुमारास हा विशाल समुदाय दोन स्पष्ट गटांमध्ये विभागला गेला.
या दोन्ही गटांनी स्वतंत्रपणे राहणे आणि प्रजनन करणे सुरू केले. युद्ध (2018 पासून) : 2018 पर्यंत या दोन्ही गटांमधील शेवटचे सामाजिक संबंधही तुटले. आता जेव्हा हे गट आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी गस्त घालतात, तेव्हा त्यांच्यात भीषण हिंसाचार आणि जीवघेणी आक्रमकता पाहायला मिळत आहे. अशा प्रकारच्या संघर्षाची नोंद यापूर्वी साधारणत: 50 वर्षांपूर्वी प्रसिद्ध प्राणिशास्त्रज्ञ जेन गुडॉल यांनी टान्झानियामध्ये केली होती. त्यावेळी एका गटाने दुसर्या गटातील सर्व नरांना ठार केले होते. मात्र, आता युगांडातील नोगो समुदायामध्ये घडणारी ही घटना त्यापेक्षाही मोठ्या स्तरावर असून, वैज्ञानिकांसाठी हा अभ्यासाचा विषय ठरला आहे.