

नवी दिल्ली : या 'चिया बिया' म्हणजे काय हे माहिती आहे का? चिया बीजांना 'साल्व्हिया हिस्पालिका' असेही म्हणतात, 'साल्व्हिया हिस्पालिका' या वनस्पतीशास्त्रीय नावाच्या या लहान काळ्या बिया आहेत. साल्बा चिया बिया हे चिया बियांचे दुसरे नाव आहे. ही वनस्पती व तिच्या बिया या मूळच्या मेक्सिकोतील आहेत. जागतिकीकरणामुळे आता त्या जगभर पोहोचल्या आहेत. आपल्याकडेही लोकांना अलीकडेच चिया बियांच्या फायद्यांबद्दल माहिती झाली आहे, परिणामी ते अनेकांच्या आहाराचा एक भाग बनले आहे.
चिया बियांमध्ये फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ओमेगा -3 फॅटी अॅसिडस् आणि अँटिऑक्सिडंटस् मुबलक प्रमाणात असतात. जर तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत चिया बियांचा समावेश करावा, असे तज्ज्ञ सांगतात. चिया बियांचा आकार लहान, गोलाकार असतो. त्या काळ्या, पांढर्या आणि तपकिरीसह विविध रंगांमध्ये येतात. चिया बियांमध्ये पोषक घटक असतात जे आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी तसेच वजन कमी करणे, केस आणि त्वचेसाठीही त्यांचे सेवन फायदेशीर आहे. चिया बियांमध्ये अँटिऑक्सिडंटस्चे प्रमाण जास्त असते, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचे चांगले कार्य करण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील आजार कमी होतात आणि शरीरातील अतिरिक्त चरबी काढून वजन कमी करण्यात मदत होते. चिया बियांमध्ये अँथोसायनिन, एक फ्लेव्होनॉईड असतो जो शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो. शरीराला ऊर्जावान ठेवण्यासाठीही अशा बियांचे सेवन उपयुक्त ठरते.