नागपूर : अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त अनेक लोक आपापले योगदान रामचरणी अर्पण करीत आहेत. यामध्ये देशाच्या हृदयस्थानी असलेले आणि खवय्येगिरीत अग्रणी असलेले नागपूर कसे मागे राहील? महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे अयोध्येत प्रभू श्री रामचरणी एक आगळा-वेगळा विक्रम अर्पण करणार आहे. श्रीरामलल्लाची अयोध्येतील भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काही दिवसांनी ते अयोध्येत तब्बल 7 हजार किलो शिरा (हलवा) तयार करणार आहेत. प्रभू श्रीरामांना भोग लावल्यानंतर हा खास शिरा अयोध्येत येणार्या दीड लाख राम भक्तांना प्रसाद म्हणून दिला जाणार आहे.
विष्णू मनोहर यांनी आजवर आपल्या नावे पाककलेतील अनेक विश्वविक्रम नोंदवले आहेत. मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ बनवण्याची त्यांची खासियत आहे. आता या शिर्यासाठी प्रचंड आकाराची खास सर्जिकल स्टीलची कढई सध्या नागपुरात तयार केली जात आहे. शेकडो किलो वजनाची ही कढई लवकरच अयोध्येच्या दिशेने रवाना केली जाईल. त्यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील विविध मंदिरातं या कढईचे विशेष पूजनही केले जाणार आहे. यासाठी लागणारे पदार्थ देशातील वेगवेगळ्या ठिकाणांतून अयोध्येत आणले जाणार आहे. शिर्यासाठीचा खास रवा नागपुरातून जाणार आहे, तर खास तूप तिरुपतीवरून आणले जाणार आहे.
शिर्यात टाकला जाणारा सुकामेवा काश्मीरमधून आणण्यात येईल. 'हा विक्रम माझा वैयक्तिक नसेल, तर तो प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्याच्या भावनेतूनच हाती घेतला आहे.', अशी भावना विष्णू मनोहर यांनी बोलताना व्यक्त केली आहे. राम हलवा तयार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ तीन तासांचा कालावधी लागणार आहे. आम्ही सकाळी 6 वाजता हलवा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करू. त्यानंतर आम्ही त्यातील नैवेद्य भगवान श्रीरामाला अर्पण करू. त्यानंतर मंदिर आणि शहरातील भक्तांमध्ये स्वयंसेवकांमार्फत हा प्रसाद वितरित करण्यात येईल, असे विष्णू मनोहर यांनी सांगितले. मी यापूर्वी अयोध्येत कारसेवेसाठी गेलो होतो.
आता पाकसेवेसाठी जाणार आहे. माझ्यासाठी ही फार भाग्याची गोष्ट असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. हा शिरा तयार करण्यासाठी 700 किलो रवा, 700 किलो तूप, 1120 किलो साखर, 1750 लिटर दूध, 1750 लिटर पानी, 21 किलो इलायची पावडर, 21 किलो जायफळ पावडर, 100 डझन केळ, 50 किलो तुलसी पत्ते, 300 किलो काजू किसमिस बदाम आदी साहित्य लागणार आहे. 22 जानेवारीला मुख्य सोहळा असल्याने सर्वसामान्यांना अयोध्येत प्रतिबंध आहे. यामुळे 24 ते 26 जानेवारीदरम्यान हे आयोजन करण्यात आल्याचे विष्णू मनोहर यांनी सांगितले.