

बीजिंग : लांबचा प्रवास असो किंवा ट्रॅफिक जॅम, प्रवाशांची सर्वात मोठी अडचण म्हणजे स्वच्छतागृहाची सोय. हीच अडचण दूर करण्यासाठी चीनमधील ‘सेरेस’ या कार उत्पादक कंपनीने एक अत्यंत धक्कादायक आणि अनोखे पेटंट फाईल केले आहे. कंपनीने कारच्या आतच टॉयलेट देण्याची संकल्पना मांडली आहे.
कंपनीने सादर केलेल्या पेटंटनुसार, हे टॉयलेट कारच्या पॅसेंजर सीटच्या खाली फिट केले जाईल. जेव्हा गरज असेल, तेव्हा एका बटनाच्या साहाय्याने किंवा ‘वॉईस कमांड’ (आवाजाद्वारे दिलेली सूचना) देऊन ते बाहेर काढता येईल. लांबचा प्रवास, कॅम्पिंग किंवा कारमध्येच राहणार्या लोकांसाठी हे फिचर अत्यंत सोयीचे ठरणार आहे. कारच्या आत टॉयलेट म्हटल्यावर दुर्गंधीची समस्या जाणवू शकते. मात्र, कंपनीने त्यावरही उपाय शोधला आहे: व्हेंटिलेशन सिस्टम : यात एक विशेष फॅन आणि एक्झॉस्ट पाईप असेल, जो कारमधील दुर्गंधी बाहेर फेकण्यास मदत करेल. वेस्ट टँक : सांडपाणी साठवण्यासाठी एक वेगळी टाकी (टँक) असेल, जी नंतर मॅन्युअली रिकामी करावी लागेल.
हीटिंग एलिमेंटस् : कचरा सुकवण्यासाठी आणि दुर्गंधी कमी करण्यासाठी यात हीटिंग सिस्टमचाही वापर केला जाईल. जेव्हा टॉयलेटचा वापर नसेल, तेव्हा ते पूर्णपणे सीटच्या खाली लपलेले असेल, ज्यामुळे कारमधील जागेची अजिबात कमतरता भासणार नाही. सध्या चिनी इलेक्ट्रिक कार कंपन्या बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी मसाज सीट, इन-बिल्ट फ्रीज आणि कराओके सिस्टम यांसारखे फिचर्स देत आहेत, त्यात आता या ‘इन-कार टॉयलेट’ची भर पडली आहे.
कारमध्ये टॉयलेटची ही संकल्पना पूर्णपणे नवीन नाही. 1950 च्या दशकात ‘रोल्स रॉयस सिल्व्हर रेथ’ नावाच्या आलिशान कारमध्येही टॉयलेट आणि टीव्हीसारख्या सुविधा देण्यात आल्या होत्या. सेरेस कंपनीने अद्याप असे कोणतेही मॉडेल लाँच करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या हे केवळ एक पेटंट आहे, त्यामुळे भविष्यात अशा कार रस्त्यावर धावताना दिसतील की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सेरेस कंपनी प्रामुख्याने त्यांच्या ‘अळीें’ या सब-ब्रँड अंतर्गत प्रगत इलेक्ट्रिक डणत बनवण्यासाठी ओळखली जाते.