वॉशिंग्टन : आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती 'कोव्हिड-19'सारख्या अनेक आजारांशी लढण्यास मदत करते. मात्र ही यंत्रणा कशी काम करते याचा कधी विचार केला आहे का? या पाठीमागे 'कार्ड-8' (CARD-8) नावाचे एक सेन्सर आहे. ते रोगप्रतिकारक यंत्रणेसाठी महत्त्वाचे ठरते. 'कार्ड-8' हे संसर्ग किंवा विषाणूचा छडा लावणे तसेच त्याच्याशी लढणे यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणेला मदत करते. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले आहे.
या संशोधनात म्हटले आहे की, 'इम्युनोलॉजिकल रिस्पॉन्स'ला (प्रतिरक्षात्मक प्रतिक्रिया) ट्रिगर करण्यासाठी मानवी शरीर आधी आजार फैलावणार्या विषाणूची म्हणजेच पॅथोजिनची ओळख करते. अर्थात हे नेमके कसे घडते याबाबत संशोधनात स्पष्ट केलेले नाही. पॅथोजिनची ओळख झाल्यावर 'कार्ड-8' आपले काम सुरू करते. 'कार्ड-8' वेगवेगळ्या विषाणूंवर कशी प्रतिक्रिया देते हे जाणून घेण्यासाठी संशोधकांनी मानवी पेशींवर अभ्यास केला. 'कार्ड-8'ची जनुकीय लक्षणे जाणण्यासाठी हा अभ्यास सस्तन प्राणी आणि मानवावरही करण्यात आला. संशोधकांनी सांगितले की, 'कार्ड-8' कोरोना विषाणू संक्रमणाविरुद्ध इम्युन रिस्पॉन्ससाठी जरुरी आहे.
त्यामध्ये किमान तीन प्रकारच्या विषाणूंचा छडा लावण्याची क्षमता आहे. 'कोरोनाविरिडे', 'पिकोर्नाविरिडे' आणि 'रेट्रोविरिडे' अशी त्यांची नावे आहेत. त्यामध्ये मानवी शरीरात खतरनाक रोग फैलावणार्या विषाणूंचाही समावेश आहे. या संशोधनानुसार, कार्ड-8 अशा 'आरएनए' विषाणूंचाही छडा लावू शकते, जे स्वतःला वेगाने बदलतात किंवा ज्यांच्यामध्ये स्वतःला मजबूत करण्याची क्षमता आहे. वेगवेगळ्या प्रजाती आणि माणसामध्ये रोग फैलावण्याच्या प्रक्रियेबाबतचा छडा लावण्यासाठी 'कार्ड-8' सिक्वेन्स किंवा अनुक्रमही वेगवेगळा असतो.