

न्यूयॉर्क : कामाच्या ठिकाणी लिंक न उघडणे असो किंवा आवडत्या शोच्या उत्कंठावर्धक क्षणी व्हिडीओ ‘बफर’ होणे असो, इंटरनेटच्या तक्रारी आपण सर्वांनीच अनुभवल्या आहेत. मोठ्या स्तरावरील आऊटेजमुळे अनेकदा दैनंदिन कामे ठप्प होतात. मात्र, एक मोठा प्रश्न सर्वांच्या मनात येतो : संपूर्ण जगातील इंटरनेट एकाच वेळी कायमचे बंद होणे शक्य आहे का?
इंटरनेट हे मुळात अनेक छोट्या-मोठ्या नेटवर्क्सचे जाळे आहे, जे घरे, व्यवसाय आणि सार्वजनिक ठिकाणांना एकमेकांशी जोडते. संपूर्ण इंटरनेट बंद पडण्यासाठी एकाच वेळी अनेक पायाभूत सुविधांवर परिणाम होणे आवश्यक आहे. डार्टमाऊथ कॉलेजमधील अभियांत्रिकीचे प्राध्यापक जॉर्ज सायबेन्को यांच्या मते, ‘हे तांत्रिकदृष्ट्या शक्य असले तरी त्यासाठी प्रचंड मोठी संसाधने किंवा अत्यंत दुर्मीळ योगायोग लागतील. त्यामुळे ही घटना घडण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.‘ते पुढे स्पष्ट करतात की, इंटरनेटची रचना सुरुवातीपासूनच अत्यंत विखुरलेली आणि लवचिक करण्यात आली आहे.
‘जर जागतिक इंटरनेट सेवा कोलमडली, तरीही घरगुती किंवा स्थानिक कार्यालयीन नेटवर्क्स आपले काम सुरू ठेवू शकतात,’ असे सायबेन्को यांनी सांगितले. जेव्हा आपण एखादा संदेश पाठवतो, तेव्हा त्याचे लहान तुकड्यांत रूपांतर होते. हे तुकडे उपलब्ध असलेल्या सर्वात वेगवान मार्गाने प्रवास करतात. जर एखादा मार्ग (उदा. समुद्राखालील केबल तुटणे) खंडित झाला, तर माहिती आपोआप दुसऱ्या मार्गाने पाठवली जाते. ‘क्लाउडफ्लेअर’ सारख्या मोठ्या सर्व्हरमध्ये बिघाड झाला तरी, त्याचा परिणाम काही तासांपुरताच मर्यादित असतो आणि तो इतर सिस्टीम्समध्ये पसरत नाही.
जर एखाद्या शक्तिशाली ‘सौर वादळा’मुळे मोठ्या प्रमाणावर आऊटेज आले, तर दुरुस्तीसाठी वेळ लागू शकतो. मात्र, अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी जगभरातील सरकारे आणि मोठ्या कंपन्यांकडे ‘बॅकअप’ योजना तयार आहेत. यामध्ये क्लाऊड स्टोरेज आणि पर्यायी वीज निर्मिती यंत्रणांचा समावेश आहे, जेणेकरून सेवा लवकरात लवकर पूर्ववत करता येईल.