Electric Hair Comb | इलेक्ट्रिक कंगवा ठरणार केसांच्या गळतीवर रामबाण उपाय?

 Electric Hair Comb |
Electric Hair Comb | इलेक्ट्रिक कंगवा ठरणार केसांच्या गळतीवर रामबाण उपाय?
Published on: 
Updated on: 

बीजिंग : केस गळणे ही जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. अनेकदा केस गळतात म्हणून लोक कंगवा वापरणे कमी करतात. मात्र, आता केस वाचवण्यासाठी कंगवा कमी वापरण्याची गरज पडणार नाही. चिनी वैज्ञानिकांच्या नवीन संशोधनात केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी एक प्रभावी आणि नवीन मार्ग शोधून काढला आहे. या संशोधनात एका विशेष कंगव्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगभरात एक अब्जांहून अधिक लोकांना केस गळण्याचा त्रास असल्याचे मानले जाते. त्यामुळे हे नवे संशोधन भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते.

‘नेचर कम्युनिकेशन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये ‘डिटँगल’ नावाची एक नवीन प्रणाली समोर आली आहे. हा कोणताही साधासुधा कंगवा नसून, कंगव्याच्या आकाराचे एक खास बायो-इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आहे. सध्या या ‘डिटँगल’ची चाचणी केवळ उंदरांवरच करण्यात आली आहे. या चाचणीचे निकाल दर्शवतात की, हा इलेक्ट्रिक कंगवा ‘अँड्रोजेनेटिक एलोपेसिया’ (AGA - पॅटर्न हेयर लॉस) या समस्येवर उपचारासाठी अत्यंत प्रभावी साधन ठरू शकते. बेइहँग युनिव्हर्सिटी, बीजिंगच्या संशोधकांनी सांगितले की, या प्रणालीमध्ये वेगवेगळ्या लांबीचे इलेक्ट्रोड आणि औषध सोडण्यासाठीचे मॉड्यूल्स दिलेले आहेत.

हे डिव्हाईस असे एक इलेक्ट्रिक फील्ड (विद्युत क्षेत्र) तयार करते, जे त्वचेवर वरवर लावल्या जाणाऱ्या औषधांच्या तुलनेत केसांच्या मुळांपर्यंत (हेयर फॉलिकल्स) ९ पट अधिक खोलीपर्यंत औषध पोहोचवते. ‘सायन्स अलर्ट’नुसार, हे उपकरण वेगवेगळ्या लांबीच्या दातांच्या (काड्यांच्या) साहाय्याने पल्स्ड इलेक्ट्रिक फील्ड तयार करते. संशोधकांचे म्हणणे आहे की, दातांच्या लांबीमधील हा फरक असे एक इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करतो, जे सर्व दात एकाच रांगेत असण्याच्या तुलनेत २.६३ पट अधिक शक्तिशाली असते.

केस पुन्हा उगवण्याच्या बाबतीत ‘डिटँगल’ दोन पद्धतीने कार्य करते : पहिले : याच्या दातातून निघणाऱ्या इलेक्ट्रिक पल्सेस (विद्युत लहरी) केसांच्या मुळांना उत्तेजित करून केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. दुसरे : याच्या लहान दातांमध्ये औषध पोहोचवण्याची यंत्रणा आहे. हे ‘इलेक्ट्रोपोरेशन’ प्रक्रियेद्वारे औषध त्वचेमध्ये खोलवर पोहोचवते. या संशोधनामध्ये इलेक्ट्रिक स्टिम्युलेशनसोबत दोन प्रकारच्या अनुवांशिक उपचारांचा (जेनेटिक ट्रीटमेंट) वापर करण्यात आला आहे : VEGFA प्लास्मिड : हे केसांच्या मुळांच्या आसपास रक्तवाहिन्यांच्या (ब्लड व्हेसेल्स) वाढीस चालना देते. SRD5A2 siRNA : हे त्या संप्रेरकाला (हार्मोन) रोखण्याचे काम करते, ज्याच्यामुळे केसांची मुळे आकुंचन पावू लागतात.

उंदरांवर केलेल्या चाचणीचे परिणाम

उंदरांवर केलेल्या विविध प्रयोगांमध्ये या संपूर्ण प्रणालीच्या एकत्रित प्रभावामुळे अत्यंत उत्कृष्ट परिणाम पाहायला मिळाले. टेस्टोस्टेरॉनमुळे केस गळणाऱ्या नर उंदरांवर २८ दिवस चाललेल्या एका प्रयोगात, ज्या उंदरांवर कोणतेही उपचार केले गेले नव्हते, त्यांच्या पाठीवरील केस गळत असलेल्या भागावर केवळ १ टक्का केस परत आले. याउलट, ज्या उंदरांना केवळ ‘डिटँगल’चे इलेक्ट्रोस्टिम्युलेशन दिले गेले, त्यांच्या केसांच्या वाढीमध्ये थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढ झालेली दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.