जोहान्सबर्ग : होमो सेपियन्सना आधुनिक मानवाचे पूर्वज मानले जाते. मात्र त्यांच्यापूर्वी एक लाख वर्षे आधीच्या पूर्वजांनाही मृतांना दफन करण्याची समज होती, असे दिसून आले आहे. जीवाश्म वैज्ञानिकांना आता दक्षिण आफ्रिकेत असेच एक प्रागैतिहासिक काळातील दफनस्थळ सापडले आहे. त्यामध्ये छोटे मेंदू असणार्या सुरुवातीच्या काळातील मानवांचे अवशेष सापडले आहेत. या सस्तन प्राण्यांना मृत प्राण्यांना दफन करण्याची समज नव्हती, असे यापूर्वी मानले जात होते.
प्रसिद्ध जीवाश्म वैज्ञानिक ली बर्जर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या एका पथकाने हा शोध लावला. पाषाणयुगातील होमिनिडस्चे हे अवशेष अनेक गुहा एकत्र असलेल्या ठिकाणी सापडले. हे ठिकाण जोहान्सबर्गजवळ असून ते युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट आहे. होमिनिडस् हे झाडांवर चढण्यातही कुशल होते. 'ईलाईल'मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, होमो सेपियन्सच्या पुराव्यांआधी किमान एक लाख वर्षांपूर्वीची ही दफनभूमी आहे.
मध्य-पूर्व आणि आफ्रिकेतील पुरातत्त्व संशोधकांनी शोधलेली यापूर्वीची सर्वात जुनी दफनभूमी होमो सेपियन्सशी संबंधित होती. आता ली बर्जर यांनी शोधलेली ही दफनभूमी इसवी सन पूर्व दोन लाख वर्षांपूर्वीची आहे. यामधील अवशेष होमो नलेडीचेही आहेत जी एक सुरुवातीच्या काळातील प्रजाती होती. त्यांचा मेंदू संत्र्याइतका होता. यावरून असे दिसते की, दफन करण्याची प्रथा होमो सेपियन्ससारख्या मोठ्या मेंदूच्या होमिनिनपुरतीची मर्यादित नव्हती. त्यांच्या पूर्वीही हे सुरू होते.