Lord Ganesha : ब्रिटिश सुपरकार कंपनीच्या बोधचिन्हावर आहे गणेश

रॉक बँड 'द बीटल्स'च्या जॉर्ज हॅरिसन यांच्याकडून मिळाली प्रेरणा
Lord Ganesha
ब्रिटिश सुपरकार कंपनीच्या बोधचिन्हावर आहे गणेश
Published on: 
Updated on: 

लंडन : जगभरात विविध कंपन्यांची आकर्षक बोधचिन्हे (लोगो) पाहायला मिळतात; मात्र ब्रिटनमधील एका आघाडीच्या सुपरकार निर्मिती कंपनीच्या अधिकृत लोगोवर थेट विघ्नहर्ता गणेशाची प्रतिमा झळकत आहे. ब्रिटनमधील लक्झरी, हाय-परफॉर्मन्स रेसिंग कार्स बनवणारी नामांकित कंपनी 'लान्झांते' (Lanzante) च्या बोधचिन्हावर पारंपरिक चार हातांची श्रीगणेशाची मुद्रा कोरलेली असून, जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्रात हे एक अनोखे आणि लक्षवेधी वैशिष्ट्य ठरले आहे.

लान्झांते ही ऑटोमोटिव्ह जगतातील अत्यंत प्रतिष्ठित कंपनी मानली जाते. १९९५ मध्ये मॅकलारेन (McLaren F1 GTR) कारसह प्रसिद्ध '२४ आवर्स ऑफ ले माँ' (24 Hours of Le Mans) ही अत्यंत खडतर आणि ऐतिहासिक शर्यत जिंकून या कंपनीने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला होता. कंपनीच्या बोधचिन्हावर गणेशाची प्रतिमा असण्यामागे संगीताच्या दुनियेतील एक अनोखा संदर्भ दडला आहे. जगातील सर्वकालीन लोकप्रिय रॉक बँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'द बीटल्स'चे दिवंगत गिटारवादक जॉर्ज हॅरिसन यांच्या प्रेरणेतून या चिन्हाचा स्वीकार करण्यात आला.

श्रीकृष्णभक्त असलेले हॅरिसन यांचे भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मावर विशेष प्रेम होते. अडथळे आणि संकटे दूर करणारी देवता म्हणून ते गणेशाचेही परम भक्त होते. लान्झांते कुटुंबीयांशी हॅरिसन यांचे अतिशय घनिष्ठ व कौटुंबिक संबंध होते. कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी आणि विघ्ने दूर व्हावीत या श्रद्धेतून, हॅरिसन यांच्या आग्रहाखातर आणि प्रेरणेने लान्झांते कंपनीने विघ्नहर्त्या गणेशाचे प्रतीक आपल्या अधिकृत बोधचिन्हात समाविष्ट केले. आजही ही ब्रिटिश कंपनी जगभरात तयार होणाऱ्या आपल्या लक्झरी सुपरकार्स आणि इंजिनिअरिंग प्रकल्पांवर अभिमानाने हे बोधचिन्ह वापरत असून, पाश्चात्त्य ऑटोमोबाईल क्षेत्रात भारतीय संस्कृतीशी संबंधित या प्रतीकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news