वॉशिंग्टन : जगभरात काही भन्नाट प्रयोग केले जात असतात. वेगवेगळे कॉम्प्यूटर लॅन किंवा इंटरनेटने एकमेकांना जोडले जातात हे आपल्याला माहिती आहेच. मात्र, मानवी मेंदूही असेच एकमेकांना जोडता येतात, हे काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील एका अनोख्या प्रयोगात दाखवून दिले होते. भारतीय वंशाच्या एका संशोधकाच्या नेतृत्वाखाली दोन व्यक्तींचा संपर्क मेंदूमार्फत साधण्यात आधी यश आले होते. त्यात दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीच्या हाताच्या हालचालींचे, विचारांचे नियंत्रण करू शकते. पुढे हा प्रयोग सहा व्यक्तींमध्येही यशस्वी करण्यात आला. तसा दावा भारतीय वैज्ञानिक राजेश राव यांनी केला होता. ते वॉशिंग्टन विद्यापीठातील संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचे सहायक प्राध्यापक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठातील वैज्ञानिकांनी दोन व्यक्तींना मेंदूमार्फत जोडले. त्यानंतर सहा व्यक्तींमध्ये हा प्रयोग करताना संशोधकांनी एका व्यक्तीच्या मेंदूतील संदेश इंटरनेटला दिले व नंतर त्यांच्या मदतीने दुसर्या व्यक्तीच्या हाताच्या हालचालींचे नियंत्रण ते संदेश पाठवून केले. दोन व्यक्तींच्या मेंदूतील जोडणी आता उपयोगी तंत्रज्ञानात रूपांतरित झाले असून, त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, असे संशोधनाच्या सहलेखिका अँड्रिया स्टॉको यांनी सांगितले. त्या मानसशास्त्राच्या सहायक प्राध्यापक आहेत. राजेश राव यांनी, शरीराला कुठलाही छेद न देता केवळ बाह्य? मार्गाने यंत्रांचा वापर यात केला व दोन व्यक्तींसाठी मेंदू जोडणारी आज्ञावली तयार केली. दोन व्यक्तींना मेंदूच्या मदतीने जोडण्याची ही प्रक्रिया सरळ आहे, त्यात गुंतागुंत नाही. एक व्यक्ती इलेक्ट्रोएनसेफलोग्राफी मशिनला जोडली जाते व ती मेंदूच्या क्रिया वाचते. त्यामुळे विद्युत संदेश वेबमार्फत दुसर्या सहभागी व्यक्तीकडे पाठवतात. त्या व्यक्तीने पोहण्याची टोपी घातलेली असते, त्यात मेंदूजवळ असलेल्या भागाशी चुंबकीय उद्दीपन कॉईल असते, त्यामुळे हातांची हालचाल होत असते. या पद्धतीने एक व्यक्तीला दुसर्या व्यक्तीला संदेश देता येतो. त्यामुळे त्या व्यक्तीचा हात पहिल्या व्यक्तीच्या संदेशानुसार हलू लागतो. या प्रयोगात व्यक्तींच्या तीन जोड्या होत्या. प्रत्येक जोडीला प्रेषक (सेंडर) व ग्राहक (रिसीव्हर) दिलेला असतो. त्याचे काही फायदे-तोटे आहेत. सहभागी व्यक्ती वेगवेगळ्या परिसरात अर्धा किलोमीटर परिसरातील इमारतींमध्ये बसून मेंदूच्या मदतीने एकमेकांशी संपर्क साधू शकतात. यात प्रत्येक संदेश प्रेषक हा संगणक गेमपुढे असतो व त्यात एका शहरावर तोफांचा मारा होतो. ते होत असताना सहभागी व्यक्ती केवळ मेंदूच्या माध्यमातून चाच्यांच्या जहाजाने टाकलेली रॉकेटस व तोफगोळे रोखू शकते व त्या गेममधील शहराचा बचाव करू शकते. संबंधित आवारात एक व्यक्ती ग्राहक म्हणजे रिसीव्हर हेडफोन लावून अंधार्या खोलीत बसते, तिला संगणकाचा गेम दिसत नसतो. त्या व्यक्तीचा उजवा हात टच पॅडवर असतो व त्याच्या मदतीने तोफगोळे (अर्थात गेममधील) फेकत असते!