मानवी मेंदू थेट कॉम्प्युटरला आदेश देणार : अॅलन मस्क
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
चालू वर्षाच्या अखेरपर्यंत मानवी मेंदूत कॉम्प्युटर चिप बसविण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाईल, अशी घोषणा 'स्पेस एक्स' आणि 'टेस्ला'चे सर्वेसर्वा अॅलन मस्क यांनी केली आहे. सर्व काही सुरळीत असले तर न्यूरॉलिंक नावाने सुरू करण्यात आलेल्या 'ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस' या 'स्टार्टअप'ची 'ह्युमन ट्रायल' म्हणजेच मानवी चाचणी डिसेंबर 2021 पर्यंत सुरू झालेली असेल. मस्क म्हणतात त्याप्रमाणे घडले तर ती वैद्यकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अविश्वसनीय अशी क्रांती ठरणार आहे. मेंदूशी निगडित अनेक आजारांवर उपचार करणे त्यामुळे सुलभ होईल. तंत्रज्ञानाच्या द़ृष्टीने पाहू जाता ही चिप मेंदूत बसविली, की ती थेट कॉम्प्युटरशी संपर्क साधेल. माणूस आपल्या मेंदूच्या मदतीने, म्हणजे जसा विचार करेल, तशा कमांड कॉम्प्युटर घेईल. माऊस, की बोर्डची गरज उरणार नाही. एका वेगळ्या अर्थाने ही बाब घ्यायची म्हटले तर माणूस स्वत:च रोबोट बनणार आहे!
सन 2016 पासून या योजनेवर काम सुरू आहे. प्राण्यांवरही विविध प्रयोग या योजनेअंतर्गत झालेले आहेत. मस्क यांची ही योजना सॅनफ्रान्सिस्कोतील 'बे' परिसरातील एका भव्य प्रयोगशाळेत साकारत आहे. अल्झायमर, पॅरालेसिस, डायमेन्शिया, पार्किन्सन्स आणि मणक्याला लागलेल्या मारासारख्या न्यूरॉलॉजिकल आजारांचे, अपघातांचे, समस्यांचे निराकरण करण्यात, उपचार करण्यात, शस्त्रक्रिया करण्यात मोठी मदत होईल. मानवी मेंदूत एक कॉम्प्युटर इंटरफेस प्रत्यारोपित केला जाईल. योजनेचे मुख्य उद्दिष्ट मानव आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील (ऑर्टिफिशियल इंटेलिजन्स) संपर्क, संबंधांचा वेध घेणे हे आहे.
खरे तर मस्क यांनी ट्विटरवर एका युजरने केलेल्या ट्विटवर रिट्विट करताना ही माहिती दिली आहे. या युजरने मानवी चाचणीत मला सहभागी करून घ्या म्हणून मस्क यांना विनंती केली होती. त्याने लिहिले, 20 वर्षांपूर्वी झालेल्या एका कार अपघातात मला खांद्याखाली अर्धांगवायू झालेला आहे. मी कायम 'न्यूरॉलिंक क्लिनिकल ट्रायल'साठी हजर आहे, हे तुम्ही गृहित धरा. त्याला उत्तर देताना मस्क यांनी लिहिले, की बिनधास्त राहा… आमचा प्रयत्नच असा आहे, की चाचणी डिसेंबर 21 पर्यंत सुरू होईल.