स्टॉकहोम : पाणी कितीही नितळ असले तरी त्यात मायक्रोप्लास्टिकचा अंश असतोच. मात्र, हेच पाणी किमान 5 मिनिटे उकळले तर त्यातील 90 टक्के मायक्रोप्लास्टिक्स पूर्ण अंशी नष्ट होतात, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. 0.2 इंचपेक्षा कमी असणारे प्लास्टिकचे तुकडे किंवा प्लास्टिकचे अंश मायक्रोप्लास्टिक नावाने ओळखले जातात. नॅशनल ओशियानिक, अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनने ही माहिती दिली आहे.
कारखाने, औद्योगिक कचरा, प्लास्टिक बाटल्या आणि छोट्या पॅकेटस्च्या माध्यमातून वापरले जाणारे प्लास्टिक जवळपास टाळता न येण्यासारखेच ठरत आले आहे. तूर्तास तरी यावर कोणताही पर्याय सापडलेला नाही. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत चालली आहे. मायक्रोप्लास्टिक्सचे शरीरावर होणारे अपाय किती घातक स्वरुपाचे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही अनेकदा दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार किमान 5 मिनिटे पाणी उकळले तरी त्यातील 90 टक्के मायक्रोप्लास्टिक्स समूळ नष्ट होतात, हा शोध विशेष महत्त्वाचा ठरू शकतो.
काही आशियाई देशात पाणी उकळून पिण्याची परंपरा कित्येक शतकापासून आहे. याचा मानवी आरोग्याला होणारा फायदा त्यावेळीही ज्ञात होता. मात्र, पाणी पूर्ण निर्जंतुक करण्यासाठी आणखी सखोल संशोधन होणे गरजेचे आहे, असे संशोधकांनी या अभ्यासात नमूद केले आहे.