वॉशिंग्टन : सोमवारी अमेरिका व शेजारी राष्ट्रांमध्ये खग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद अनेक हौशी खगोलप्रेमींनी लुटला. अमेरिकेसह कॅनडा आणि मेक्सिकोमध्येही हे सूर्यग्रहण दिसले. या खग्रास म्हणजेच संपूर्ण सूर्यग्रहणावेळी सूर्य व पृथ्वीच्या मध्ये सरळ रेषेत आलेल्या चंद्रामुळे काही वेळ सूर्य पूर्णपणे झाकोळला गेला आणि पृथ्वीवर चंद्राची छाया पडली. अंतराळातून ही काळी छाया एखाद्या कृष्णविवरासारखी म्हणजेच ब्लॅक होलसारखी दिसली. 'नासा'ने त्याची छायाचित्रे शेअर केली आहेत.
'नासा'ने या सूर्यग्रहणाला लाईव्ह स्ट्रीमही केले होते. जवळजवळ शतकभराच्या काळात आता प्रथमच न्यूयॉर्कच्या पश्चिम व उत्तर क्षेत्रात हे खग्रास सूर्यग्रहण दिसले. मेक्सिकोच्या समुद्रकिनारपट्टीजवळ असलेल्या माजातलान शहरात हे सूर्यग्रहण सर्वात आधी दिसले. अमेरिकेत टेक्सासमध्ये हे ग्रहण सर्वप्रथम सुरू झाले.
आता अमेरिकेत ऑगस्ट 2044 पर्यंत खग्रास सूर्यग्रहण दिसणार नाही. पृथ्वीवरून हे सूर्यग्रहण अनेकांनी पाहिले; पण अंतराळातूनही ते पाहण्याचा आनंद अंतराळवीरांनी घेतला. 'नासा'ने 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये लिहिले की, अंतराळातून कधी सूर्यग्रहण पाहिले आहे का? हे आमच्या अंतराळवीरांनी पाहिलेले द़ृश्य आहे. त्यानंतर 'नासा'ने एक व्हिडीओही शेअर केला. त्यामध्ये पृथ्वीवर एक विशाल छाया पडलेली दिसून येते. ते पाहिल्यावर असे वाटते की, पृथ्वीवर एखादे कृष्णविवरच निर्माण झाले आहे!