नवी दिल्लीः सोशल मिडियात अनेक थक्क करणारे व्हिडीओ पाहायला मिळत असतात. त्यामध्ये काही तरी जोडतोड करून 'जुगाड' बनवणार्यांचेही व्हिडीओ असतात. जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही! लोक असे जुगाड शोधून काढतात की पाहताच अवाक् व्हायला होतं. असाच एक अतरंगी जुगाड समोर आला आहे. एका तरुणानं चक्क जगातील सर्वात उंच बाईक तयार केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही बाईक तब्बल 10 फूट उंच आहे.
नक्कीच इतकी उंच बाईक तुम्ही यापूर्वी पाहिली नसेल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका बाईकची दोन्ही चाकं काढून त्यावर उंच असे लोखंडी बार बसवले आहेत. या बारवर चार लहान लहान चाकं आहेत. या चाकांमध्ये इंजिनची चैन बसवण्यात आली आहे. किक मारताच ही तिन्ही चाकं एकाच वेळी फिरू लागतात. परिणामी बाईक हळूहळू पुढे जाते. पण बाईकची उंची खूप जास्त असल्यामुळे 3 माणसं ती पकडण्यासाठी उभी असलेली दिसतात. या जुगाडू बाईकचा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
आतापर्यंत हा व्हिडीओ 25 हजारांपेक्षा अधिक नेटकर्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही बाईक दिसायला वेगळी असली तरी बहुतांश नेटकर्यांना ती काही आवडलेली नाही. परिणामी हे काय तयार केलंय? या बाईकनं बाजारात कसं जायचं? या बाईकवर बसायचं कसं? असे सवाल करत या जुगाडू बाईकची फिरकी घेत आहेत!