बीजिंग : महाभारतातील मयसभेची वर्णने थक्क करणारीच आहेत. मय नावाच्या स्थापत्यविशारदाने बांधलेल्या या सभागृहात जळावर स्थळाचे आणि स्थळावर जळाचा बेमालूम आभास निर्माण केला होता. नव्या तंत्रज्ञानानेही असे अनेक आभास निर्माण केलेले आहेत. त्याची प्रचिती चीनची राजधानी बीजिंगमधील एका मॉलच्या छतावर पाहायला मिळते. या मॉलमध्ये खरेदीसाठी आलेले लोक वर नजर करून पाहतात आणि त्यांना दिसले वर अनेक लहान-मोठे मासे आपल्या डोक्यावर पोहत चालले आहेत! हे 'व्हर्च्युअल अॅक्वॅरियम' अनेकांना थक्क करणारे आहे.
बीजिंग मॉलमध्ये हे अनोखे 'व्हर्च्युअल ड्रीम अॅक्वॅरियम' आहे. ते नेक्स्ट-जनरेशन व्हर्च्युअल अॅक्वॅरियम आणि स्क्रीन सेव्हर आहे. एरवी कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपण ज्या करामती पाहू त्या इथे भव्य स्वरूपात मॉलच्या छताचाच पडदा करून पाहायला मिळतात. हे द़ृश्य खरे वाटावे इतके सुंदर असते. तिथे अनेक शार्क, व्हेल, स्टिंग रे व अन्य जलचर आपल्या डोक्यावरून पोहत चालले असल्याचे वाटते.
अर्थातच हे मासे खरे नाहीत व हे द़ृश्यही खरे नाही. तब्बल 250 मीटर लांबीच्या एलईडी स्क्रीनवर हे द़ृश्य प्रकट केले जाते. त्यासाठीचा खर्च आहे 32 दशलक्ष डॉलर्स. अनेक पर्यटक खरेदीपेक्षा हे अनोखे द़ृश्य पाहण्यासाठीच मॉलमध्ये जातात. लोकांना आकर्षित करण्यासाठीच हे बनवले असल्याने मॉलच्या मॅनेजमेंटचा हेतूही साध्य होतो!