

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या पाचूचा मान ‘बहिआ एम्राल्ड’ कडे जातो. या पाचूचे वैशिष्ट्य म्हणजे हा केवळ एक खडा नसून, तो अनेक पाचूंच्या स्फटिकांचा एक मोठा पुंजका आहे. या महाकाय रत्नाचे वजन तब्बल 341 किलो (सुमारे 1.7 दशलक्ष कॅरेट) आहे. हा पाचू 2001 मध्ये ब्राझीलमधील ‘बहिआ’ या खाणीतून सापडला होता, म्हणूनच त्याला ‘बहिआ एम्राल्ड’ असे नाव पडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या पाचूची किंमत सुमारे 400 दशलक्ष डॉलर्स (भारतीय रुपयांत अंदाजे 3,300 कोटींहून अधिक) इतकी वर्तवण्यात आली आहे.
हा पाचू इतका मोठा आहे की, तो एखाद्या खडकासारखा दिसतो. परंतु, त्यात खोल हिरव्या रंगाचे चमकदार स्फटिक जडलेले आहेत. हा मानवनिर्मित नसून निसर्गाच्या कुशीत लाखो वर्षांच्या प्रक्रियेतून तयार झालेला एक दुर्मीळ आविष्कार आहे. बहिआ एम्राल्ड हा केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नाही, तर त्याभोवती असलेल्या कायदेशीर वादांमुळेही प्रसिद्ध राहिला आहे. या पाचूवर अनेकांनी आपला मालकी हक्क सांगितला होता.
2005 च्या कतरिना वादळात हा पाचू अमेरिकेतील एका गोदामात पाण्याखाली गेला होता, जिथून तो चोरीला गेल्याचीही चर्चा झाली होती. दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर सध्या तो सुरक्षित स्थळी ठेवण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठ्या पाचूच्या चर्चेत भारताचे नावही मागे नाही. काही वर्षांपूर्वी पन्ना (मध्य प्रदेश) येथील खाणीतही मोठे पाचू सापडले आहेत. तसेच, उदयपूरच्या संग्रहालयातही काही ऐतिहासिक आणि भव्य पाचूंचे दर्शन घडते.