बँकॉक : औषधांचे वेगवेगळे साईड इफेक्टस् दिसून येतात. मात्र, औषधांमुळे डोळ्यांचा रंगही बदलतो हे कोरोना काळात दिसून आले! थायलंडमधील सहा महिन्यांच्या एका बाळाचे गडद तपकिरी डोळे 'कोव्हिड-19' वरील उपचारासाठी दिलेल्या 'फेवीपिरावीर' या अँटिव्हायरल औषधामुळे गडद निळ्या रंगाचे झाल्याचे दिसून आले. अर्थात 'फेवीपिरावीर' औषधामुळे रुग्णाच्या डोळ्याचा रंग बदलल्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
'फेवीपिरावीर' हे औषध अनेक प्रकारच्या विषाणूंना नष्ट करण्यासाठी वापरले जात असते. त्यामध्ये इन्फ्लुएंझा आणि इबोला व्हायरसचाही समावेश आहे. या विषाणूंमधील जनुकीय सामग्रीची प्रतिरूपे निर्माण होण्यापासून हे औषध रोखते. विशेषतः 'आरएनए' असलेल्या विषाणूंसाठी हे औषध वापरतात. ते अशा आरएनए रेणूमध्ये घुसून त्याला निष्प्रभ करते. 2020 च्या सुरुवातीला चीनमध्ये 'कोव्हिड-19' वरील उपचारासाठी या औषधाला मंजुरी देण्यात आली. या आजाराला कारणीभूत ठरणारा 'सार्स-कोव्ह-2' हा कोरोना विषाणूही 'आरएनए' प्रकारचाच आहे. भारत, जपान आणि थायलंडसह अन्य अनेक देशांमध्येही सौम्य ते गंभीर स्वरूपाच्या 'कोव्हिड-19' वरील उपचारासाठी हे औषध वापरले गेले.
'कोव्हिड-19' झालेल्या लहान मुलांवरील उपचारासाठी या औषधाचाच प्रामुख्याने उपयोग केला जातो. त्याच्या काही सर्वसामान्य साईड इफेक्टस्मध्ये डायरिया, रक्तात यूरिक अॅसिडचा स्तर वाढणे आदींचा समावेश आहे. मात्र, अचानक डोळ्यांचा रंग निळा होणे हे अनपेक्षितच होते. डिसेंबर 2021 मध्ये असा परिणाम प्रथम दिसून आला. वीस वर्षांच्या एका तरुणाचे डोळे हे औषध घेतल्यावर एक दिवसानंतर अचानक निळे झाले. एका रुग्णाचे डोळे तर रात्री चकाकू लागल्याचेही उदाहरण समोर आले होते. 2022 मध्ये तीन रुग्णांचे डोळे तसेच नखे आणि दातही असे चकाकू लागले.
थायलंडमध्ये या सहा महिन्यांच्या बाळाचे डोळेही हे औषध घेतल्यानंतर अचानक 'इंडिगो ब्ल्यू' रंगाचे झाले. हे औषध घेतल्यानंतर अठरा तासांनी त्याच्या डोळ्यांमध्ये झालेला हा बदल त्याच्या आईच्या लक्षात आला. सूर्यप्रकाशात त्याचे डोळे गडद निळ्या रंगात चकाकत होते. त्याच्या डोळ्यांच्या दोन्ही कॉर्नियात निळे पिग्मेंटस् विकसित झाल्याचे दिसून आले. या बाळाला तीन दिवस हे औषध देण्यात आले. आजारातून बरे झाल्यावर पाच दिवसांनी त्याच्यावरील उपचार थांबवल्यावर त्याचे डोळे पूर्ववत झाले!