

अयोध्या : रामनगरी अयोध्यामध्ये पुन्हा एकदा विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू आहे. पर्यटन विभागातर्फे शरयू नदीचा किनारा, राम की पैडी आणि इतर घाटांवर दिव्यांच्या माळांनी एक अद्भुत द़ृश्य तयार केले जाईल. यंदाचा दीपोत्सव पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम मोडणार आहे.
उत्तर प्रदेशचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह यांनी सांगितले की, ‘विभागाची तयारी वेगाने सुरू आहे. 2017 पासून अयोध्यामध्ये भव्य आणि दिव्य दीपोत्सव साजरा केला जात आहे. हाच अनुभव कायम ठेवत, यंदाही शरयू नदीवर सर्वात जास्त दिवे लावले जातील आणि सर्वात मोठ्या आरतीचे आयोजन होईल. यावर्षी 26 लाखांहून अधिक दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची योजना आहे.’
मंत्री जयवीर सिंह पुढे म्हणाले, ‘दीपोत्सव केवळ अयोध्येची सांस्कृतिक ओळखच नाही, तर जागतिक स्तरावर त्याची ओळख अधिक मजबूत करेल. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतरचा हा दुसरा दीपोत्सव आणखी भव्य आणि दिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. राम की पैडीसह इतर घाटांवर 26 लाखांहून अधिक दिवे लावून नवा विश्वविक्रम केला जाईल.
‘यावेळी शरयू नदीच्या किनार्यावर आतापर्यंतची सर्वात मोठी आरती आयोजित केली जाईल, ज्यात 1100 पेक्षा जास्त धर्माचार्य, संत-महात्मा आणि नागरिक सहभागी होतील. या आयोजनाची तयारी तीन दिवसांपूर्वीच सुरू होईल. गिनीजच्या नियमांनुसार सर्व व्यवस्था केली जाईल.
या विश्वविक्रमासाठी विद्यार्थी स्वयंसेवक मदत करणार आहेत. हे स्वयंसेवक गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमांनुसार दिव्यांची सजावट, ते लावणे, त्यांची मोजणी करणे आणि पडताळणी करण्याची जबाबदारी पार पाडतील. दीपोत्सवाच्या तयारीसाठी पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन, अवध विद्यापीठ आणि इतर संस्थांमध्ये समन्वय साधला जात आहे. पर्यटन आणि संस्कृती विभागाचे प्रमुख सचिव मुकेश कुमार मेश्राम म्हणाले, ‘दीपोत्सव आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा दर्शवतो. या वर्षी अयोध्येत होणारा दीपोत्सव मागील वर्षांच्या तुलनेत अधिक भव्य करण्यासाठी तयारी सुरू आहे.’