

गुवाहाटी : अपत्यहीन दांपत्यांसाठी ‘इन-विट्रो फर्टिलायझेशन’ (आयव्हीएफ) तंत्रज्ञानाचा वापर आता सामान्य झाला आहे. मात्र, आता दुर्मीळ प्रजातींच्या प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आसाममध्ये या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्थानिक ‘लखीमी’ जातीच्या मादी वासराने जन्म घेतला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे या प्रजातीच्या प्राण्याचा जन्म होण्याची ही पहिलीच आणि दुर्मीळ घटना मानली जात आहे.
या वासराचा जन्म ‘आसाम वेटरनरी अँड फिशरी युनिव्हर्सिटी’मध्ये झाला असून, ही संस्था देशी गुरांच्या संरक्षणात महत्त्वाचे काम करत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट लिहून या ऐतिहासिक यशाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, ‘आज आसामने एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे... संस्कृती आणि सर्जनाचा एक सुंदर संगम! आपल्या पशुपालन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी यामुळे नवे मार्ग खुले होतील; जसे की देशी जातींचे संरक्षण, आजारांवर नियंत्रण, दूध उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे’. त्यांनी या संशोधनात योगदान देणाऱ्या सर्व पशुवैद्यकीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत ‘‘जय जय गौ माता!’’ असा नारा दिला.
‘लखीमी’ ही आसामची मूळ देशी गायीची प्रजाती आहे. या गायी आपल्या दणकटपणा आणि कोणत्याही वातावरणात जुळवून घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखल्या जातात. मध्यम ते लहान आकाराच्या या गायी प्रामुख्याने करड्या, लाल किंवा पांढऱ्या रंगाच्या असतात. ईशान्य भारतातील उष्ण व दमट हवामानाशी त्या सहज जुळवून घेतात. या गायींची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत उच्च असते. कमी दर्जाच्या चाऱ्यावरही त्या सहज जगू शकतात आणि त्यांना खूप कमी देखभालीची गरज असते. ही गाय दररोज १.५ ते ३ लिटर दूध देते.
जरी हे प्रमाण इतर गायींपेक्षा कमी असले, तरी तिचे दूध अत्यंत पौष्टिक आणि A2 प्रोटीनने समृद्ध मानले जाते. या प्रजातीचे बैल आसामच्या डोंगराळ आणि चिखलमय शेतजमिनीत नांगरणी व ओझे वाहण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. यामुळे स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि सेंद्रिय शेतीला मोठा पाठबळ मिळतो. शासनाच्या प्रेरणेने शास्त्रज्ञ ‘आयव्हीएफ’सारख्या प्रगत प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करून या देशी आणि महत्त्वाच्या प्रजातीचे रक्षण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.