

ब्युनोस आयर्स : अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष हाविएर मियेली यांच्या सरकारने देशातील ऐतिहासिक हिमनदी संरक्षण कायदा (ले डे ग्लॅसियर्स) मोडीत काढल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे अँडीज पर्वतरांगांमधील संवेदनशील हिमनद्यांच्या क्षेत्रात खाणकामाचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत धोक्यात आला आहे.
2010 मध्ये लागू झालेला अर्जेंटिनाचा हा कायदा लॅटिन अमेरिकेतील अशा प्रकारचा पहिलाच कायदा होता. या कायद्यानुसार हिमनद्या आणि त्यांच्या सभोवतालच्या पेरिग्लेशियल (गोठलेली जमीन) भागात कोणत्याही औद्योगिक किंवा खाणकामावर कडक बंदी होती. हिमनद्यांना पाण्याचे नैसर्गिक साठे मानून त्यांचे संरक्षण करणे हे राष्ट्रीय कर्तव्य ठरवण्यात आले होते.
मियेली सरकारने संसदेत (137 विरुद्ध 111 मतांनी) या कायद्यात बदल मंजूर केले. नवीन नियमांनुसार आता कोणत्या हिमनद्या संरक्षित करायच्या आणि कोणत्या खाणकामासाठी खुल्या करायच्या, याचा निर्णय केंद्र सरकारऐवजी प्रांतीय अधिकारी घेतील. केवळ पाण्याचे महत्त्वाचे कार्य करणार्या हिमनद्यांनाच संरक्षण मिळेल. मात्र, हे महत्त्व कोण आणि कसे ठरवणार, यावर स्पष्टता नाही. मियेली यांच्या मते, जुन्या कायद्यामुळे परकीय गुंतवणूक रोखली जात होती. लिथियम, तांबे आणि सोन्याच्या खाणकामाद्वारे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पर्यावरणवाद्यांच्या मते, हा निर्णय म्हणजे पाण्याच्या साठ्यांवर आत्मघातकी हल्ला आहे. अर्जेंटिनातील सुमारे 16 टक्के लोकसंख्या म्हणचेच सुमारे 70 लाख लोक त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी या हिमनद्यांवर अवलंबून आहेत. गेल्या 10 वर्षांत येथील हिमनद्या आधीच 17 टक्क्यांनी आक्रसल्या आहेत. खाणकामामुळे या प्रक्रियेला वेग येईल. यापूर्वी वेलाडेरो सोन्याच्या खाणीतून झालेल्या सायनाईड गळतीमुळे स्थानिक नद्या प्रदूषित झाल्या होत्या. आता संरक्षणात्मक कवच हटवल्यामुळे अशा घटनांची भीती वाढली आहे. या कायद्याच्या बदलामुळे अर्जेंटिनामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत. ग्रीनपीससारख्या संस्थांनी याला तीव्र विरोध केला आहे. ‘ऊर्जा परिवर्तनासाठी लागणारी खनिजे मिळवण्यासाठी हिमनद्या नष्ट करणे हा विरोधाभास आहे,’ असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. स्थानिक रहिवासी साऊल झेबालोस म्हणतात: ‘आम्हाला माहीत आहे की जर आम्ही आमच्या पाण्याचा बचाव केला नाही, तर आम्हाला हे शहर सोडून जावे लागेल. विष प्यायचे की गाव सोडायचे, असा हा प्रश्न आहे.