

बीजिंग : आज जगभरातील अनेक घरे, कार्यालये व सार्वजनिक इमारतींमध्ये काचेच्या पेटीत वेगवेगळे मासे शोभेसाठी ठेवले जातात. या ‘फिश किपिंग', ‘फिश टँक' किंवा ‘ॲक्वेरियम'लाही शेकडो वर्षांचा इतिहास आहे हे तुम्हाला माहिती आहे का? शोभेसाठी घरात मासे पाळले जाणे हे प्राचीन काळापासूनच सुरू आहे. शोभेसाठी घरात असे सुंदर मासे पाळण्याची पद्धत सर्वप्रथम चीनमध्ये सुरू झाली.
या संदर्भातील इतिहास आणि रंजक माहिती अशी : इसवी सन पूर्व तिसऱ्या ते चौथ्या शतकात (सुमारे २००० वर्षांपूर्वी) चीनमध्ये तलावांमधील सोनेरी रंगाचे 'कार्प' मासे (गोल्डफिश) वेगळे करून त्यांना लहान तलावांमध्ये ठेवण्यास सुरुवात झाली. गाँग घराणे (Song Dynasty - ९६० ते १२७९ इसवी) : या काळात लोकांनी हे मासे मातीची किंवा काचेची भांडी आणि काचेच्या बाऊल मध्ये घरात शोभेसाठी ठेवण्यास सुरुवात केली. यामुळेच चीनला या कलेचा जनक मानले जाते. १६व्या शतकात ही पद्धत चीनमधून जपानमध्ये पोहोचली.
जपानी लोकांनी ‘कोई' (Koi Fish) आणि विविध प्रजातींचे सुंदर मासे पाळण्यास आणि त्यांच्या नव्या प्रजाती तयार करण्यास सुरुवात केली. १७व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून हे शोभीवंत मासे युरोपमध्ये (विशेषतः इंग्लंडमध्ये) पोहोचले. १८४० च्या दशकात ब्रिटनमध्ये काचेच्या टाक्यांमध्ये वनस्पती आणि मासे एकत्र ठेवून ‘इकोसिस्टम' तयार करण्याची आधुनिक पद्धत सुरू झाली. ‘Aquarium' हा शब्द १८४५ च्या सुमारास इंग्रजी निसर्गशास्त्रज्ञ फिलिप हेन्री गॉस यांनी लोकप्रिय केला. अशा प्रकारे घरात शोभेचे मासे पाळण्याच्या परंपरेची मूळ सुरुवात प्राचीन चीनमधून झाली आणि पुढे युरोपमध्ये त्याला आधुनिक 'ॲक्वॅरियम'चे रूप मिळाले.