पुणे : सदाशिव पेठेत एकशे चौदा वर्षे वयाची भारत इतिहास संशोधक मंडळाची इमारत जीर्ण-शीर्ण झाली होती. त्यामुळे त्याचे जुने रूप आबाधित ठेवत सुमारे चार कोटी रुपये खर्च करून या संपूर्ण इमारतीचा जीर्णोद्धार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. 15 ऑगस्टपर्यंत या इमारतीचे काम पूर्ण करण्याचे लक्ष विश्वस्तांनी ठेवले आहे.
संपूर्ण भारतातील विविध राजवटी आणि मराठ्यांच्या इतिहासाचे संशोधन करणारी संस्था म्हणून सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ देशात प्रसिद्ध आहे. इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी 1910 मध्ये स्थापन केलेल्या या मंडळाच्या इमारतीचा तब्बल ११४ वर्षांनी जीर्णोद्धार होत आहे. जुने वैभव आबाधित ठेवत आधुनिक काळातील सोयी-सुविधा असा संगम यात केला जात आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचे नियोजन सुरू झाले. मात्र, काही परवानग्या महापालिकेकडून घेण्यात भरपूर वेळ गेला. त्यामुळे एप्रिल 2024 पासून या इमारतीच्या नूतनीकरणास प्रारंभ झाला.हे काम अतिशय वेगाने सुरू असून संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. बाहेरील दगडी भिंत, त्या वरच्या जुन्या काळातील जीर्ण झालेले बांंधकाम त्याच पद्धतीने करण्यात येत आहे. तसेच आवारातील जुन्या मातीच्या खोल्या पाडून परिसरातील जुना मलबा जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात येत आहे.
राजवाडे सभागृहात 125 लोकांची बसण्याची सुविधा आहे. त्याला अद्ययावत रूप दिले जात आहे. (खर्च : 3 कोटी रुपये)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत लिहिलेल्या पुस्तकापासून अनेक दुर्मीळ ग्रंथांचे विशेष दालन.
वरच्या मजल्यावर जाण्यासाठी स्वतंत्र लिफ्टची सुविधा. तेथे चार दालने होणार. यात टेबलांवर जुन्या दुर्मीळ मूर्ती बघायला मिळतील.
याच ठिकाणी मोडी, फारसी, पर्शियन भाषेसह मंदिर स्थापत्य, दुर्ग स्थापत्य यावर जिज्ञासूंच्या वर्गांसाठी खास दालन.
खालच्या मजल्यावर राजवाडे सभागृहाला लागून चार स्वतंत्र दालने असतील, यात ऑफिसमध्ये पुस्तक विक्री केद्र राहील.
दुसर्या दालनात अभ्यासकांसाठी कलादालन राहील.
10 लाख कागदपत्रांतून 3 लाख पत्रे निवडून त्यांचे मोडीतून देवनागरित रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पाच वर्षांत यावरून सुमारे 100 खंड प्रकाशित करण्यात येणार आहे. यात शिवकालीन पत्रांसह सर्वच मराठा साम—ाज्यातील सरदारांनी लिहिलेल्या दुर्मीळ पत्रांचा संग्रह आहे.
जैनांच्या 24 तीर्थंकरांपैकी 23 तिर्थंकरांची चारशे वर्षे जुनी दुर्मीळ चित्रे या ठिकाणी आहेत. त्याचे संवर्धन करण्यासाठी 10 लाख रुपये किमतीचे मशीन मंडळाने खरेदी केले आहे. हे मशिन चित्रांवरची बुरशी, दुर्गंधी काढण्याचे काम करते.
अशी तब्बल एक हजार 600 मिनीएचर या ठिकाणी आहेत. त्यासाठी अजित गाडगीळ यांनी सुमारे 15 लाखांची देणगी दिली आहे.
सुलोचना पाटील यांनी पुस्तकांच्या कपाटांसाठी सुमारे साडेसात लाखांची देणगी दिली आहे.
या ऐतिहासिक वास्तूतील दस्तऐवजाचे कार्यालय मागच्या इमारतीत तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असून, प्रवेशद्वार ते मध्यभागी असणारे भव्य राजवाडे सभागृहाच्या डाव्या व उजव्या बाजूचे दोन हॉल यातील फर्निंचर नवे केले जात आहे. सुमारे शंभर वर्षे जुन्या इमारतीतून मोठा राडा-रोडा काढण्याचे काम सध्या सुरू आहे.
वि. का. राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे, काशिनाथ नारायण साने, दत्तात्रेय विष्णू आपटे, चिंतामण विनायक वैद्य, चिंतामण गणेश कर्वे, न. चिं. केळकर, विनायक लक्ष्मण भावे, नारायण भगवानराव पावगी, गणेश सखाराम खरे, गंगाधर नारायण मुजूमदार, शंकर श्रीकृष्ण देव, दत्तो वामन पोतदार यांच्यासह एकूण सत्तरपेक्षा जास्त संशोधकांचा सहभाग या संस्थेच्या विस्तारामध्ये आहे.
ऐतिहासिक वारसा असणारी ही इमारच शहराचे भूषण आहे. महापालिकेने याला दुर्मीळ वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे अत्यंत सावधपणे इमारतीची डागडुजी, नूतनीकरण सुरू आहे. ही इमारत दोनमजली असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी राजवाडे सभागृहाच्या मागच्या बाजूने लिफ्ट तयार केली जात आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना 7 जुलै 1910 रोजी विश्वनाथ राजवाडे आणि सरदार खंडेराव मेहेंदळे यांनी अप्पा बळवंत चौकात असलेल्या सरदार मेहेंदळे यांच्या वाड्यात केली. पुढे ही संस्था सदाशिव पेठ परिसरातील स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित झाली. ही इमारत शंभर वर्षात जीर्ण-शीर्ण झाली होती. आता तिला अद्ययावत रूप दिले जात आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये 2019 साली 15 लाखांहून अधिक ऐतिहासिक कागदपत्रे आणि मराठी (देवनागरी आणि मोडी), फारसी, पोर्तुगीज आणि इंग्रजी भाषेतली 30 हजार हस्तलिखिते आहेत. मंडळाच्या सुसज्ज संग्रहालयात चार हजारांहून अधिक जुनी नाणी, एक हजार रंगीत चित्रे आणि काही शिल्पे व शिलालेख जतन करून ठेवली आहेत. मंडळाच्या ग्रंथालयातील 27 हजारांहून अधिक इंग्रजी- मराठी पुस्तके संशोधकांना तेथेच विनामूल्य वाचनासाठी किंवा घरी नेऊन वाचण्यासाठी नाममात्र फीमध्ये उपलब्ध होऊ शकतात. ही संसाधने प्रामुख्याने मराठा साम्राज्य, मराठा संस्कृती आणि मराठी इतिहासावरची आहेत. भारतावरील मुगल आणि ब्रिटिश साम्राज्यावरील साहित्याचा मोठा संग्रहही त्यात आहे.