

मेलबर्न : आगामी दशकांमध्ये अंटार्क्टिका खंडाचे तापमान दक्षिण गोलार्धातील इतर भागांच्या तुलनेत 1.4 पट अधिक वेगाने वाढू शकते, असा इशारा एका नवीन संशोधनातून देण्यात आला आहे. या वेगवान तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होऊन धुवीय परिसंस्थेचा समतोल बिघडण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
जर जागतिक सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक काळाच्या तुलनेत 3.6 अंश फॅरेनहाईट (2 अंश सेल्सिअस) ने वाढले, तर अंटार्क्टिकात उष्णतेचा हा वेग अधिक तीव होईल. सध्या जगाचे तापमान आधीच 2 अंश फॅरेनहाईट (1.1 अंश सेल्सिअस) ने वाढले आहे. उत्सर्जनाचे प्रमाण सध्यासारखेच राहिल्यास 2050 पर्यंत आणि उत्सर्जन वाढल्यास 2040 पर्यंतच आपण ही धोकादायक मर्यादा ओलांडू शकतो. आतापर्यंत अंटार्क्टिका खंड वाढत्या जागतिक तापमानापासून काहीसा अलिप्त वाटत होता. याचे मुख्य कारण म्हणजे दक्षिण महासागराची क्षमता. हा महासागर प्रचंड प्रमाणात उष्णता शोषून घेतो.
चक्रीय प्रवाह : अंटार्क्टिकाभोवती वाहणारे शक्तिशाली वारे आणि पाण्याचे प्रवाह या गोठलेल्या खंडाला बाहेरील उष्णतेपासून सुरक्षित ठेवतात. मात्र, आर्क्टिकमध्ये (उत्तर धुव) आधीच अशा प्रकारची वेगवान तापमानवाढ सुरू झाली आहे, जिथे तापमान जगाच्या सरासरीपेक्षा चार पट वेगाने वाढत आहे. उत्तर धुवावर बर्फ वितळल्यामुळे उघड्या पडलेल्या समुद्राचे पाणी सूर्याची उष्णता अधिक शोषून घेते, ज्यामुळे बर्फ अधिक वेगाने वितळतो. याला ‘आईस-अल्बेडो फीडबॅक’ म्हणतात. संशोधकांच्या मते, आगामी शतकात अंटार्क्टिकाच्या सभोवतालच्या समुद्राचे तापमान वाढल्याने तिथेही अशीच साखळी प्रक्रिया सुरू होईल. ‘अनेक वर्षांपासून अंटार्क्टिका जागतिक तापमानवाढीच्या प्रभावापासून सुरक्षित असल्याचे वाटत होते. परंतु, नवीन अभ्यासानुसार समुद्राच्या पृष्ठभागाचे दीर्घकालीन तापमान वाढल्याने येथेही ‘अंटार्क्टिक ॲम्प्लिफिकेशन’ सुरू होईल,’ असे मोनाश विद्यापीठातील हवामानशास्त्रज्ञ आरियान पुरिच यांनी स्पष्ट केले.